समाधान कांबळे
शेतकरी मोठ्या मेहनतीने आपल्या शेतात पिक घेत असतो. चांगला भाव मिळेल, यासाठी तो मेहनत घेत असतो. पिकाची आपल्या मुला प्रमाणे काळजी घेतो. लावणी पासून ते उत्पादन येईपर्यंत त्याची देखभाल ही करतो. त्यातून चार पैसे चांगले मिळतील, अशी त्याची अपेक्षा असते. पिकावर तो खर्चही करतो. पण ज्यावेळी शेतातलं पिक विकण्याची वेळ येते आणि त्याला भाव मिळत नाही त्यावेळी तो शेतकरी पुर्ण पणे कोसळून जातो. त्याचा खर्च ही निघत नाही. असचं संकट हिंगोलीतल्या एक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गणेश बुलबुले हे शेतकरी आहे. त्यांची हिंगोलीच्या पुसेगाव इथं शेती आहे. त्यांनी अर्धा एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली होती. ज्या वेळी त्यांनी टोमॅटोची लागवड केली त्यावेळी टोमॅटोचे दर हे चढे होते. बाजारात चांगला भाव होता. शिवाय मागणी ही मोठ्या प्रमाणात होती. पण मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक ही बाजारात कमी होती. त्यामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. शंभर किलो दराने टोमॅटो विकला जात होता.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर गणेश यांनी अर्धा एकरवर टोमॅटो लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टोमॅटोची लागवड ही केली. ते पीक चांगल्या पद्धतीने जपले. आता टोमॅटो काढणीला आले होते. पण त्याच वेळी नको तेच झाले. अचानक टोमॅटोचे भाव कोसळले. शंभर रुपये किलो असणारे टोमॅटोचा भाव दोन ते तीन रुपये किलो झाला आहे. त्यामुळे गणेश हे आर्थिक संकटात सापडले आहे. त्या दरात टोमॅटो बाजारात विकून झालेला खर्चही निघणार नाही.
बाजारात जरी हा टोमॅटो घेवून गेला तरी त्याचे गाडी भाडं ही त्यातून सुटणार नाही असं गणेश सांगतात. या संपूर्ण परिस्थितीला कंटाळून गणेश बुलबुले यांनी आपली अर्धा एकरमधील टोमॅटोची झाडे तोडून टाकली आहेत. शिवाय जे टोमॅटो आले होते ते त्यांनी जनावरांना खाण्यासाठी टाकले आहे. ज्या पिकाला ज्या हातांनी जपलं त्याच पिकाला स्वत:च्या हाताने तोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यातून आता आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. बाजारात हमी भाव असला पाहीजे असं ही ते म्हणाले.