
निनाद करमरकर
महाराष्ट्र आणि मुंबईत राहून ही अनेकांना मराठी बोलण्याचे वावडे आहे. मराठी माणूस आणि भाषेचा द्वेष करणारे द्वेष्ठेही मुंबई महाराष्ट्रात राहातात. अनेकांना यावरून चोपही मिळाला आहे. काही तर मराठी येत असूनही मराठी बोलण्याचं टाळतात. काहींना तर मराठी बोलणं म्हणजे कमी पणाचं वाटतं. काही तर बिंदास पणे मला मराठी येत नाही काय करायचं ते कर असं बोलतात. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. इथं एका आरपीएफ जवानाने अशीच भाषा वापरत अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या मराठीचा अपमान केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा', अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्याने ही भाषा वापरली. उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंग वरुन सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले होते. त्यावेळी एका आरपीएफ जवानाने त्यांच्या बरोबर हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून 'मराठीत बोला' असं सचिन कदम यांनी म्हटलं. त्यावर मला मराठी येत नाही, असं त्याने सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
त्यावर याबाबत मी डीआरएमकडे तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी सांगितलं. त्यावर जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानाने वापरली. तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आरपीएफचा मराठी अधिकारी ही आला. 'त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला', असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर हा वाद वाढत गेला. मराठी अधिकारीच मराठी माणसाला हिंदीत बोलण्याचा सल्ला देत होता. त्यामुळे तिथे आलेले मनसे पदाधिकारी आक्रमक झाले.
मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा सरकारी कामकाजात वापरण्याबाबतचा जीआर काढला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असं मनसेच्या सचिन कदम यांनी त्यांनी सांगितलं. त्यावर 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?' असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world