Goa and Konkan Fuel Shortage : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं होतं. तर कंपन्यांमध्ये जिथं शक्य असेल तिथं वर्क फ्रॉम होम करण्याची सूचनाही दिली आहे. दरम्यान मे महिन्यात तुम्ही फिरायचा प्लान करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गोव्याला जाण्याचा प्लान करीत असाल तर तुमच्या फिरण्यावर बंधनं येऊ शकतात.
गोव्यात फिरण्यावर येऊ शकतात बंधनं...
मुंबई गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. तसंच रत्नागिरी जिल्ह्यातही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. एकीकडे सीएनजी गॅससाठी 3 ते 4 तास रांगा, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत गावी आलेले चाकरमानी तसंच पर्यटकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही दिवसात पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार साठा येत नसल्याने पंपचालक हवालदिल झाले आहेत. परिणामी पेट्रोल पंप चालकांकडून इंधनाच्या साठ्याचं वितरण करण्यात मर्यादा येत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी हजार ते पंधराशे रुपयांचं पेट्रोल आणि डिझेल दिलं जात आहे. दुसरीकडे सीएनजीसाठी ३ ते ४ तास रांगेत थांबावं लागत आहे. त्यामुळे कोकणात आलेले पर्यटक आणि चाकरमानी त्रस्त झाले आहेत.
फिरायचं कसं, पर्यटक त्रस्त...
पेट्रोल-डिझेलवर मर्यादा आल्याने फिरण्यावर बंधन येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात सीएनजीसाठी ३ ते ४ तास रांगेत थांबावं लागत असल्याने पर्यटकांचा बराच वेळ रांगेत जात आहे. त्यामुळे पर्यटक त्रस्त झाले आहेत.