Nashik News : नाशिकमध्ये एका कुटुंबाने मुलीच्या लग्नात एक वेगळा आणि देशहिताचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वी नागरिकांना सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. देशाचा आयात खर्च कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या फड कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी नवीन सोनं खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील जुन्याच दागिन्यांचा वापर करत साधेपणाने पण अभिमानाने हा विवाहसोहळा साजरा केला जाणार आहे.
मोदींच्या आवाहनानंतर, फड कुटुंबाचा मोठा निर्णय
नाशिक शहरातील कामटवाडे परिसरात राहणाऱ्या राजेंद्र फड यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. कन्या प्रतिमा फड हिचा विवाह दोन दिवसांनी म्हणजेच 14 मे रोजी सिन्नर तालुक्यातील सौरभ बोडके यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका लॉन्सवर धुमधडाक्यात पार पडणार आहे. घरात मांडव उभारण्यात आला आहे, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि पाहुण्यांची लगबगही वाढली आहे. पण या लग्नाची चर्चा फक्त आनंदामुळे नाही तर एका वेगळ्या निर्णयामुळे देखील आहे. लग्न म्हटलं की, नवीन सोन्याची खरेदी हा जणू परंपरेचाच भाग मानला जातो. मात्र फड कुटुंबाने यावेळी नवीन सोनं खरेदी न करता घरातीलच जुन्या दागिन्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशहिताचा विचार करणारा निर्णय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाने प्रेरित होऊन फड कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे. मुलीच्या लग्नात नवे दागिने न घेण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण देशहिताला प्राधान्य देत कुटुंबाने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामागे संपूर्ण कुटुंबाची एकमताने साथ आहे. घरातील महिलांनीही आनंदाने याला पाठिंबा दिला आहे आणि विशेष म्हणजे वरपक्षानेही या निर्णयाचे स्वागत करत त्याला पाठिंबा दिला आहे, अशी भावना नववधूच्या वडिलांनी व्यक्त केली. लग्नातील आनंद, परंपरा आणि उत्साह कायम ठेवत देशहिताचा विचार करणारा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशावर आर्थिक ताण येत असताना, नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारावी असा संदेश फड कुटुंब देत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world