IAS पूजा खेडकर यांचे आई-वडील कुठं गायब झाले? पोलिसांनी सुरु केला शोध

वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांचे आई-वडील गायब झाले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्याबाबत नवी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा यांच्या आई-वडिलांशी सध्या कोणताही संपर्क होत नाहीय. खेडकर यांची आई मनोरमा खेडकर पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या एका गावात पिस्तूल घेऊन धमकावताना दिसली होती. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा यांचे पती आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर या प्रकरणातले सहआरोपी आहेत. दिलीप खेडकर राज्य सरकारमधील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस खेडकर यांच्या घरी पोहोचली त्यावेळी त्यांना खेडकर पती-पत्नी भेटले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे आणि अहमदनरमध्ये या टीम तपास करत आहेत. खेडकर आम्हाला तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या भलगावमधील सरपंचांना जमिनीच्या वादावरुन पिस्तूल घेऊन धमकावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांना त्यांनी बंदूक परवान्याचा गैरवापर केलाय का? अशी विचारणा करण्यात आली. पुणे महापालिकेनंही खेडकर यांच्या विरोधात नोटीस बजावलीय. त्यांच्या इमारतीच्या जवळचे अवैध बांधकाम आठवड्याभराच्या आत हटवण्याची नोटीस पुणे महापालिकेनं दिली आहे. 

ऑडी कारवर लावलेल्या लाल दिव्यामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. खेडकर यांच्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांची 40 कोटींची संपत्ती असताना त्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र कसं मिळालं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IAS पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल सादर; नवी मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा  )

प्रशिक्षण घेतलेल्या विभागांमध्येही त्यांनी गैरवर्तन केल्याचे अहवाल संबंधित विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे दिले आहेत. खेडकर या ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. 3 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी सुरू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन, शासकीय निवासस्थान, कार्यालयात स्वतंत्र दालन आणि शिपाई आदी व्यवस्था करून ठेवण्याबाबत अगोदरच भेट देऊन, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश पाठवून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता.