प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात देखील अगदी पहाटेपासूनच राज्यच नाही तर देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. देवाच्या दर्शनासाठी तब्बल सहा ते सात तासांची प्रतीक्षा करावी लागत असून मंदिराबाहेर दूरवर रांगा पोहोचल्या आहेत. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या मुख्य उत्तर महाद्वाराबाहेर VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव NDTV मराठीच्या कॅमेरात कैद झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाताळ आणि नवीन वर्षानिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता 19 डिसेंबर 2024 रोजी त्र्यंबकेश्वर संस्थानने पत्रक काढून 5 जानेवारीपर्यंत VIP दर्शन बंद असल्याचं जाहीर केलं होतं. केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पूर्वनियोजित वेळेत दर्शन दिलं जाईल असाही त्या पत्रकात उल्लेख होता. मात्र असं असताना VIP दर्शनाच्या नावाखाली फिरणारे एजंट कोण, संस्थानाला याबाबत माहिती आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
नक्की वाचा - 15 दिवसात 12 बेरोजगार तरुण झाले 100 कोटींचे मालक, मालेगावात पैशांचा पाऊस
धक्कादायक बाब म्हणजे या दर्शनाच्या रांगेत काही एजंट फिरत असतात. हे एजंट विशेषत: परराज्यातील भाविकांना आपलं लक्ष्य करतात आणि कोणाकडून दर्शनासाठी 1100 रुपये तर कोणाकडून 2100 रुपयांची मागणी केली जाते. मोठ्या ग्रुपमध्ये आलेल्या काही भाविकांना तर चक्क पॅकेज दिलं गेल्याचंही भाविकांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितलय. विशेष म्हणजे अशा प्रकारे व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्धा तासाच्या आतच दर्शन देखील होत असल्याची त्र्यंबकेश्वरमध्ये चर्चा आहे. एकीकडे 22 डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांनने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. मात्र दुसरीकडे असा काळाबाजार सुरू असून यामध्ये मंदिर संस्थांनचा देखील सहभाग आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्र्यंबकेश्वरमधील पोलिसांकडून यावर कारवाई का केली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नववर्षाची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगापासून करावी यासाठी राजस्थानमधून एक मोठं कुटुंब आलं होतं. त्यांना या एजंटने 5500 रुपयांचं पॅकेज सांगितलं. आधी पैसे द्या, मग दर्शन करून देतो असं कुटुंबाला सांगितलं. परंतू याची गॅरेंटी कोण घेणार म्हणून राजस्थानमधील कुटुंबाने एजंटला पैसे देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला पॅकेजबद्दल सांगताना त्यामध्ये पुजेची थाळी आणि इतर सामान देखील मिळेल असं देखील सांगितलं होतं.