Malhar Certificate : राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास आणि भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका नव्या घोषणामुळे वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही नितेश राणे यांनी मटणांच्या दुकानांवरुन अनेक वक्तव्य केली आहेत. आता तर त्यांनी राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिलं जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यानुसार, महाराष्ट्रात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. या दुकानांचे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिले जाईल. नितेश राणे यांनी लोकांना आवाहन केले की ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्या. बहुतेक हिंदू असे मानतात की मांस सेवनाची झटका ही एक नैतिक पद्धत आहे. कारण प्राण्याला दीर्घकाळ त्रास न घेता त्वरित मारला जातो. तर मुस्लीमांमध्ये हलाल पद्धतीच्या मांसची सेवन केलं जातं. यामध्ये प्राण्याची मान अर्धी कापून यातून बराच वेळ रक्त जाऊ दिलं जातं, यातून प्राण्याच्या शरीरातील दूषित घटक बाहेर पडतात अशी मान्यता आहे.
दरम्यान भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला आहे. आता मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मात्र, या योजनेचे नाव त्वरीत बदलावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना केली आहे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळे या योजनेचे नाव बदलण्यात यावे, अशी विनंती जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे. याबाबत त्यांनी नितेश राणेंना एक पत्र देखील पाठवले आहे.