आपल्या कडक शिस्तीसाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांच्या कार्याची भुरळ आता थेट वारकरी संप्रदायालाही पडली आहे. सध्या सुरू असलेल्या आषाढी वारीत वारकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रामाणिक सेवेचा आणि धडाडीच्या निर्णयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे. वारीच्या मार्गावर तुकाराम मुंढे यांचे मोठे कटआउट्स आणि पोस्टर्स झळकले असून, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
"विचारांची कढ... तुकाराम!"
पुण्याकडून सासवडच्या दिशेने जाणाऱ्या पायी वारीत हा प्रकार पाहायला मिळाला. वारीत चालणाऱ्या शेकडो वारकऱ्यांनी स्वतःहून तुकाराम मुंढे यांचे पोस्टर्स आणि फलक आपल्या हातात घेतले होते. या फलकांवर "जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कढ... तुकाराम!" अशा अत्यंत बोलक्या आणि भावनिक ओळी लिहून वारकऱ्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. वारीत कोणत्याही राजकीय नेत्याऐवजी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे असे पोस्टर्स वारकऱ्यांनी हाती घेणे, ही अतिशय दुर्मिळ आणि मोठी कौतुकाची बाब मानली जात आहे.
पाहा VIDEO
भेसळविरोधी मोहिमेमुळे मुंढे पुन्हा चर्चेत
तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत प्रशासकीय सेवेमध्ये जिथे जिथे काम केले, तिथे तिथे आपल्या शिस्तीचा आणि नियमांचा ठसा उमटवला आहे. सद्यस्थितीत ते अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवली जात असलेली मोठी भेसळविरोधी मोहीम प्रचंड यशस्वी ठरत आहे.
(नक्की वाचा- DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)
लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ते सध्या संपूर्ण राज्यात विशेष चर्चेत आहेत. त्यांच्या याच धडाडीच्या कामाची पोचपावती म्हणून वारकऱ्यांनी वारीच्या पवित्र वातावरणात त्यांच्या नावाचा जयघोष करत त्यांचा हा अनोखा गौरव केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world