ओंकार कुलकर्णी, धाराशिव
Dharashiv News : तुळजापूर ड्रग्ज तस्करीप्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी, त्यातील 21 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा. तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान तीन वर्षापासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केला आहे.
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या आरोपी पुजाऱ्याना कायमस्वरुपी तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंदीची कारवाई करण्यात येणार आहे.