Uddhav Thackeray Devendra Fadnavis flight meeting: महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून एकामागून एक अतिशय नाट्यमय आणि मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला तब्बल 6 खासदारांच्या बंडखोरीचा मोठा धक्का बसल्यानंतर, अवघ्या काही दिवसांमध्ये थेट विमानामध्ये एक अभूतपूर्व राजकीय दृश्य पाहायला मिळाले आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रचंड मोठ्या राजकीय भूकंपाने राज्य ढवळून निघालेले असतानाच, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एकाच विमानाने मुंबई ते नागपूर असा प्रवास केल्याने राजकीय चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.
हस्तांदोलन आणि सूचक प्रतिक्रिया
खासदार फुटल्याच्या अत्यंत तणावपूर्ण पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यासाठी मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये बसले होते. याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रवास करत होते. विमानात दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होऊन उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस देखील केली.
या प्रवासादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे इतरही प्रमुख नेते उपस्थित होते. या अनपेक्षित भेटीनंतर नागपूरला उतरल्यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही भेटलो हीच मोठी बातमी आहे, अशी अत्यंत सूचक आणि मिश्किल प्रतिक्रिया दिली.
( नक्की वाचा : भाजपामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद ?; 'स्वतःला OSD समजता का?' मेधा कुलकर्णींचा अभिमन्यू पवारांना थेट सवाल )
ठाकरे गटाचे स्पष्टीकरण
या हायप्रोफाईल विमान प्रवासानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून तातडीने यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, या एकत्र विमान प्रवासावरून राजकीय चर्चांना उधाण येण्याचे कोणतेही कारण नाही.
नागपूर हे मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड आहे, तर उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा आधीपासूनच नियोजित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण सध्या इंधन बचतीच्या संदर्भाने बोलत आहेत. त्यामुळे नेते आता खाजगी विमानाने प्रवास करायचे टाळून व्यावसायिक विमानाने जात असतील, तर यामागचे कारण निव्वळ राष्ट्रहित आहे, असे म्हणत अंधारे या भेटीतील राजकीय हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Operation Tiger चा दुसरा अंक! खासदारांपाठोपाठ 14 आमदारही शिंदेंसोबत जाणार? ठाकरे गटाची धाकधूक वाढली )
खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर किंवा राजकीय घडामोडींच्या काळात बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठी नागपूर विमानतळावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. विमानतळ परिसरात ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
'संकटाशी लढणारा नेता' नागपुरात पोस्टर्सबाजी
पक्षामध्ये एवढी मोठी फूट पडलेली असतानाही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नागपूर विमानतळ परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. विमानतळाच्या संपूर्ण परिसरात "संकटाशी न डगमगणारा, लढणारा फक्त एकच नेता" अशा आशयाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे पोस्टर्स झळकत आहेत. या विदर्भ दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे नागपुरातील स्वागताचा स्वीकार केल्यानंतर पुढे रवाना होतील आणि शनिवारी ते यवतमाळ येथे जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी तसेच पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक चर्चा करणार आहेत. पक्ष फुटीनंतर विदर्भातून उद्धव ठाकरे आता बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.