योगेश शिरसाट, प्रतिनिधी
कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही अडचण पेलता येते, हे सिद्ध केलंय पातूर तालुक्यातील शिर्ला गावच्या मामा-भाच्याने. गावातील राजेंद्र लिलाबाई घुगे आणि प्रतीक मालती पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत अनुक्रमे बारावा आणि चौथा क्रमांक मिळवून एकाच वेळी क्लासवन अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. छोट्याशा गावातून, हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडत या दोघांनी महाराष्ट्रात प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे.
प्रतीक पारवेकर हा फक्त चार वर्षांचा असतानाच वडिलांच्या निधनाने अनाथ झाला. आई मालती पारवेकर हिनं अंगणवाडी सेविका म्हणून काम करून मुलाचं शिक्षण थांबू दिलं नाही. मुलाला चांगलं आयुष्य मिळावं या ध्येयाने तिनं त्याला मामाच्या गावी शिर्ला येथे आणलं. गरिबीच्या झळा सोसत, आईच्या आशीर्वादाने प्रतीकने पहिल्याच प्रयत्नात एससी प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळवला. “आईनं हार मानली नाही, म्हणून मी जिंकलो,” असं भावनिक वक्तव्य त्याने निकालानंतर केलं.
एमपीएससीचा निकाल जाहीर होताच गावात जल्लोष पसरला. दोघांचाही भव्य सत्कार करण्यात आला. “ही केवळ आमची नव्हे, तर संपूर्ण गावाची जिद्दीची कमाई आहे,” असं या दोघांनी हसत सांगितलं.
नक्की वाचा - Womens World Cup 2025: विश्वविजेत्या लेकींसाठी खजिना खुला! BCCIची सर्वात मोठी घोषणा, महिला ब्रिगेड मालामाल
गावात संघर्षाच्या मातीतून उगवले दोन तारे..
राजेंद्र घुगे यांचं बालपणही तितकंच कठीण. फक्त सहा महिन्यांचा असताना पित्याचं छत्र हरवलं. दोन एकर शेती आणि गरिबीच्या सावटात शिक्षण पूर्ण करणं हीच मोठी कसरत होती. मात्र राजेंद्र यांनी दिवस-रात्र मेहनत करून अखेर एमपीएससीच्या एससी प्रवर्गातून बाराव्या क्रमांकाने यश संपादन केलं. त्यांचे भाऊ हेमंत घुगे, जे गावातच ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, यांनी राजेंद्र, प्रतीक या दोघांना आर्थिक आणि मानसिक साथ दिली. “कष्टाची साथ, आईचा आशीर्वाद आणि अभ्यासाची शिस्त ह्याचं हे फळ आहे,” असं हेमंत सांगतात.
पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मामा-भाच्याने एकाच डब्यातलं जेवण वाटून खाल्लं. घड्याळ विकत घेण्यासाठी पैसे नव्हते; मुलाखतीसाठी लागणारा टाय-सूटदेखील दोघांनी शेअर करून वापरला. पण या अडचणीतून त्यांनी मोठं यश गाठलं. “एक डबा, एक ध्येय — एवढंच आमचं मंत्र होतं,” असं दोघेही अभिमानाने सांगतात.
यशानंतरची भावना, ‘आता खरी सेवा सुरू होतेय'..
“आज मी वर्ग-१ अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनात निवड झालो आहे — हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमान आहे. माझ्या आईचा त्याग, मामाचं मार्गदर्शन आणि भावाचं प्रेम — ह्यांनीच मला इथवर आणलं. हे यश मी माझ्या आईला अर्पण करतो.” — प्रतीक मालती साहेबराव पारवेकर म्हटलं आहे.
“हे यश माझ्या कुटुंबाच्या, बहिणीच्या मायेच्या आणि भावाच्या साथीतून मिळालं आहे. प्रवास कठीण होता पण मनात सेवा भाव होता. आता खरी सेवा सुरू होतेय.. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणं हाच संकल्प आहे.” राजेंद्र लिलाबाई किसनराव घुगे यांनी आपलं मत मांडलं. अकोल्याच्या पातुर तालुक्यात शिर्ला गाव आज आनंदात आहे. एका गावातून एकाचवेळी दोन क्लासवन अधिकारी घडले. तेही मामा-भाचा! त्यांच्या जिद्दीने दाखवून दिलं की “संघर्ष मोठा असला तरी स्वप्नं कधीच लहान नसतात. शिर्ल्याच्या मामा-भाच्याची संघर्षातून भरारी एकाच वेळी दोघेही झाले क्लासवन अधिकारी!