नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Crime News : अकोला शहरात सावत्र बापाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता धुळे जिल्ह्यातील सोनगीरमध्येही नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम काकाने 3 वर्षांच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे. दरम्यान, याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयूर बापू माळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नराधम काकाने पीडित मुलीला घरी नेलं आणि आतून कडी लावली
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने सोनगीर पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेनं तक्रारीत म्हटलंय की, काल संध्याकाळी सासू दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत माझी तीन वर्षांची मुलगीही होती. काही वेळानंतर सासू घरात आल्यावर त्यांना मुलीबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, काका मयूर बापू माळी मुलीला खेळवण्यासाठी घरी घेऊन गेला. थोड्या वेळानंतर मुलगी घरी पोहोचली आणि अचानक रडू लागली. तेव्हा तिला काय झालं असं विचारलं असता, तिने गुप्तांग दुखत असल्याचं सांगितलं.
नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं थेट VIDEO बनवला अन् नंतर..
शेजारी राहणाऱ्या नराधम काकाने पीडित मुलीला घरी नेऊन घराची कडी आतून लावली होती. त्यानंतर आरोपीने तिचं लैंगिक शोषण केलं, अशी माहिती समोर आलीय. दरम्यान, पीडित मुलीनं घडलेल्या या धक्कादायक प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितलं आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अकोल्यातही घडला होता धक्कादायक प्रकार
अकोला शहारात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. सावत्र बापाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याच्यार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. या घटनेमुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असं मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती.
नक्की वाचा >> सोनं चोरट्यांच्या सुळसुळाट,'त्या' ज्वेलर्समध्ये महिलेनं साडीत लपवला सोन्याचा हार..CCTV फुटेज आलं समोर