लाल साडी अन् डोक्यावर लाल कॅप...; महाराष्ट्रातील 'या' गावात  महिलांची रात्रभर गस्त, कारण काय?

नागपूर जिल्ह्यातील वलनी गाव या कारणामुळे सध्या चर्चेत आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नागपूर:

प्रतिनिधी, संजय तिवारी

गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या एका गावात गावच्याच महिला रात्री तासभर गस्त घालतात, असं तुम्हाला सांगितलंत तर खरं वाटेल काय? पण, हे खरं आहे. लाल साडी, लाल कॅप असा गणवेश घातलेल्या या महिला गावच्या अन्य महिला पुरुषांना आस्थेनं विचारपूस करतात. त्यांच्या तक्रारींची दखल घेतात आणि परिसरातील असामाजिक घडामोडींची माहिती सरपंच आणि पोलीस पाटलांपर्यंत तसेच थेट पोलिसांपर्यंत पोहचवितात.

नागपूर जिल्ह्यातील वलनी गाव या कारणामुळे सध्या चर्चेत आहे.  ग्राम स्वच्छतेचे काम करताना दिसणाऱ्या लाल साडी घातलेल्या या महिला याच गावातील महिला कमांडो आहेत. छत्तीसगढ राज्यानंतर भारतातील हा पहिला महिला कमांडो प्रकल्प होय. या महिला रात्री गावातील अवैध घडामोडी आणि दारुभट्टी सारखे अवैध धंद्यांना जरब बसवण्यासाठी गस्त घालतात. छत्तीसगढची एक महिला समाज सुधारक शमशाद बेगम यांनी गावगुंड, नक्षली, माओवादी आणि अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात छत्तीसगढच्या हजारो महिलांना स्वयंस्फूर्तीने जागृत करून प्रशिक्षित केलेल्या शमशाद बेगम यांनी केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात हा ग्रामीण महिला कमांडो प्रशिक्षणाचा पायलट प्रकल्प साकारला आहे.

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील वलनी गावात या महिला गेल्या महिन्याभरापासून नारी शक्ती या शब्दाचं खरं दर्शन घडवतायेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली, विश्र्वेसारेय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) नागपूर आणि जे डी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संयुक्त विद्यमाने जारी या अकरा महिन्यांच्या प्रकल्पाद्वारे केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानांतर्गत वलनी गावात महिलांनी दारुडे आणि अवैध दारू विक्रेत्यांमध्ये जरब बसवली आहे.

Advertisement

केवळ एक वर्षांपूर्वी याच महिला असहाय्य, अबला होत्या. हे गाव अवैध दारूचे केंद्र झालेले होते. यापैकी कित्येक स्त्रियांनी दारूमुळे पती आणि कुटुंबीय गमावले आहेत. याबाबत येथील एक महिला सांगते, आमच्या गावात दारूची दुकाने होती, त्याचा आम्हाला खूप त्रास होता. आजूबाजूची दहा ते वीस वर्षांची मुले आहेत ते दारू पिऊन यायचे आणि आई वडिलांना शिव्या द्यायचे. आणि पती सुद्धा दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचे. आणि चौकामध्ये शिव्या देत होते. मग याच महिलांनी एकजूट होऊन अवैध धंदेवाल्यांना पिटाळून लावले होते. आता याच गावाची उन्नत भारत अभियानांतर्गत महिला कमांडो योजनेच्या पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून छत्तीसगढ येथून महिला कमांडो योजनेच्या प्रणेत्या शमशाद बेगम आणि त्यांच्या टीमने त्यांना आत्मरक्षेचे पद्धतशीर प्रशिक्षण आणि गाव सुधारणेचे पाठ शिकवले आहे.

Advertisement

नक्की वाचा - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान, कशी जाते यांची निवड?

तीनशे रूपये विद्यावेतन..
इथे त्यांना अकरा महिने प्रत्येकी तीनशे रुपये विद्यावेतन (stipend) मिळणार आहे. याबाबत महिलांना आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणतात,  ग्राम कमांडो असल्याची ओळख त्यांच्यासाठी सर्व काही आहे. आज कमांडो टीममध्ये राहून एक हिम्मत मिळाली. आपला नवरा दारूमध्ये गमावला. पण, आपल्या मुलांना दारूच्या व्यसनापासून रोखण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी महिला प्रयत्न करीत आहेत. 

याबाबत वलनी ग्राम पंचायतचे सरपंच स्वप्निल गावंडे म्हणतात, मला या महिलांचा अभिमान वाटतो. वलनी हे महाराष्ट्रातील पहिलं गाव आहे, जिथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक हजार लोकसंख्येचं गाव वलनी जर इतकं पुढे जाऊ शकतं, तर हे कोणालाही शक्य आहेत. ज्या पध्द्तीने आमच्या महिला कमांडोंनी दारूबंदी केली, तसाच प्रत्येक गावातील महिलांनी पुढाकार घेतला तर, आज जो गोंधळ होतो, महिलांवर अत्याचार होतात  हे रोखण्यात येतील.

केंद्राच्या उन्नत भारत अभियानांतर्गत छत्तीसगढच्या बाहेर देशातील पहिलं महिला कमांडो प्रोजेक्ट महाराष्ट्रातील वलनी गावात राबविण्यात येत आहे आणि त्यातून चांगले परिणाम दिसून येत आहेत. लाल साडी, डोक्यावर लाल कॅप, गळ्यात शिट्टी आणि ओठांवर घोषणा. या महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास अगदी पाहण्यासारखा आहे.