Varandha Ghat: वरंध घाट मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 30 मेपर्यंत बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वरंध गाव ते रायगडदरम्यानच्या रस्त्याच्या बांधकामामुळे वरंध घाटाचा मार्ग बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याचे आणि आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे 8 एप्रिलपासून ते 30 मे 2024पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड तसेच लहान-मोठ्या वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
(गुढीपाडव्याचा दिवस फळांच्या राजाने केला 'गोड', बाजारातून आली Good News)
नेमके कोणते बांधकाम आहे सुरू?
- राष्ट्रीय महामार्ग 965 डी.डी. किमी 88/100 (राजेवाडी) ते किमी 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे, संरक्षण भिंती बांधण्याचे आणि आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीचे काम सुरू आहे.
- वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीमध्ये असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. पण साखळी क्रमांक 88/100 (मौजे वरंध) ते 96/700 (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरू करायचे आहे. यादरम्यान खोल दरी आणि उंच डोंगर असून रस्त्याचे रुंदी काम करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे.
- तसेच या जागेमध्ये सुरू असलेल्या वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक सुरू ठेवल्यास काम वेळेपूर्वी करणे शक्य होणार नाही.
- म्हणून वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करावा, अशी विनंती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग (पेण) आणि पोलीस अधीक्षकांकडून (रायगड) करण्यात आली होती.
(Gudi Padwa: गोडवा पसरवणारे पुण्यातील 'घर', खवय्यांसाठी 20 प्रकारच्या पुरणपोळ्यांची मेजवानी)
हे आहेत पर्यायी मार्ग
- नागरिकांनी पुण्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे या मार्गाचा वापर करावा.
- कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड- कोल्हापूर; अशा पर्यायी मार्गाची शिफारस करण्यात आली आहे.
(पश्चिम की सेंट्रल रेल्वे, कुठले एस्केलेटर सर्वात चांगले; उत्तर मिळालं!)