मनोज सातवी, वसई:
Giant Citron Fruit Weight: बालपणी बाराखडीत घोकले जाणारे ‘इ... इडलिंबू'चा हे नाव अनेकांनी ऐकले, पण प्रत्यक्षात हे फळ पाहण्याचा अनुभव फारच थोड्यांना मिळाला असेल. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले हे दुर्मिळ फळ सध्या बाजारातही क्वचितच दिसते. मात्र विरारमध्ये एका शेतकऱ्याच्या बागेत तब्बल दीड किलोहून अधिक वजनाचा भलामोठा इडलिंबू लागल्याने परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Palghar News: खबरदार! ही चूक कराल तर.... 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कारण काय?
अबब! एवढ्या किलोचं इडलिंबू
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरार पश्चिमेतील उंबरगोठण परिसरात शास्त्रशुद्ध शेती करणारे शेतकरी फरमीन परेरा यांच्या वाडीत हे अनोखे यश पाहायला मिळाले. त्यांच्या बागेतील इडलिंबूचे वजन तब्बल १ किलो ६५० ग्रॅम इतके निघाले असून हा विशाल आकार पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे.
विशेष म्हणजे, फरमीन परेरा हे यापूर्वी दुबईमध्ये अरेबियन ऑटोमोबाईल कंपनीत असिस्टंट सर्व्हिस मॅनेजर म्हणून सुमारे १५ वर्षे कार्यरत होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते मायदेशी परतले आणि शेतीकडे वळले. सध्या ते तीन एकर क्षेत्रात विविध जातींच्या केळींसह वेलचीची लागवड आधुनिक पद्धतीने करत आहेत.तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात इडलिंबूचे रोप लावले.
सुरुवातीला सामान्य आकाराची फळे येत होती. मात्र गेल्या काही महिन्यांत एका फळाचा आकार झपाट्याने वाढताना दिसून आला. योग्य काळजी घेतल्यानंतर तयार झालेल्या या फळाचे वजन पाहून स्वतः फरमीनही अचंबित झाले. हवामानातील बदलामुळे असा परिणाम झाल्याचा त्यांचा अंदाज असला तरी, सध्या मात्र या भल्या मोठ्या इडलिंबूमुळे वसई विरारकरांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world