Versova Hit And Run: मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारने वर्सोवा बीचवर झोपलेल्यांना चिरडलं; रिक्षाचालकाचा मृत्यू

Versova Hit And Run: मुंबईतील वर्सोवा परिसरामध्ये हिट अँड रनची घटना घडलीय. दुर्घटनेमध्ये एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Versova Hit And Run: राज्यातील हिट अँड रन प्रकरणांमध्ये (Mumbai Hit And Run) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत केवळ पुण्यातच अपघाताच्या मोठमोठ्या घटना घडताना दिसत होत्या. पण आता मुंबईतही वेगवान वाहनांमुळे नागरिकांचा बळी जात आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरात भरधाव कारने दोन जणांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे दोघंही वर्सोवा बीचवर झोपले होते, त्यावेळेस ही घटना घडलीय. 

(नक्की वाचा: मुंबईत घरातून सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड)

भरधाव कारने दोघांना चिरडले

सोमवारी (12 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने समुद्रकिनारी झोपलेल्या दोन जणांना चिरडल्याचे घटना घडली आहे. या घटनेनंतर SUV चालक आणि त्याचा मित्र फरार झाले होते. पण पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. 

(नक्की वाचा: सावधान! म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती)

रिक्षाचालकाचा मृत्यू, एक जण जखमी

वर्सोवा हिट अँड रन प्रकरणामध्ये एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. गणेश यादव असे त्याचे नाव आहे. गणेश यादव रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. उकड्याने हैराण झाल्याने गणेश आपला मित्र बबलूसोबत समुद्रकिनारी झोपायला गेला होता. यादरम्यान सोमवारी पहाटे एका पांढऱ्या रंगाच्या SUVने गणेश यादवाला अशा पद्धतीने चिरडले की या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा:बहिणीवर वाईट नजर ठेवायचा; सावत्र मुलाने केली बापाची हत्या)

लोकांना चिरडल्यानंतर आरोपी फरार

कारचालकाने दोन जणांना चिरडल्यानंतर चालक आणि त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान फरार होण्यापूर्वी चालकने कारमधून बाहेर येऊन रिक्षाचालकाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने दोन्ही तरुण फरार झाले. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांनी गणेश यादवला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  

Advertisement

रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फरार आरोपींच्या नागपुरातून मुसक्या आवळल्या आणि मंगळवारी (13 ऑगस्ट) कोर्टासमोर हजर केले. सुनावणीदरम्यान आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुर्घटनेच्या वेळेस आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते की नव्हते, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.  

आधी पुणे आता मुंबईही हिट अँड रन प्रकरणामुळे हादरतेय

पुण्यामध्ये पोर्शे कार दुर्घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलामुळे दोन जणांचा नाहक बळी गेला आहे. या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पुणे, नागपूर शहरातही हिट अँड रनच्या घटना घडल्या. मुंबईतील वरळी परिसरातही बीएमडब्ल्यू कारने धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मिहीर शाहला अटक करण्यात आली होती. 

Advertisement