विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाने झोडपून काढलं. गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे रहिवाशी भागात देखील पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भंडाऱ्यात ग्रामीण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द धरणातून सुरू असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. विसर्ग 10 ते 12 हजार क्युसेक्सने वाढवला जाण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
(नक्की वाचा - रत्नागिरीत जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे; वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवली)
गडचिरोतील पावसाचा वाहतुकीवर परिणाम
गडचिरोली जिल्हाभरातील 30 राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग सुद्धा बंद झालेले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांचा तालुका मुख्यालयासह जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलेला असून जनजीवन विस्कळीत झालेला आहे. भामरागडच्या पर्लकोटा नदीचे पाणी दुपारी पुलावर चढल्यानंतर झपाट्याने वाढत आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे पाणी भामरागडमधील बाजारपेठेत शिरले. त्यामुळे दुकानदारांची एकच धावपळ झाली. रात्रभर भामरागडचा नदीकडील भाग जलमय अवस्थेत होता. रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे 200 पेक्षा जास्त गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील भामरागड, गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, सिरोंचा या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.
(नक्की वाचा: खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले)
चंद्रपुरात अनेक गावांत पाणीच-पाणी
चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरणाचे सर्व सातही दारे एक मीटरने उघडण्यात आली आहेत. यामुळे नदी काठावरील नागरिकांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील नागरिकांची व्यवस्था नजीकच्या शाळांमध्ये करण्यात आली. मूल तालुक्यातील आठ मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
चंद्रपूर तालुक्यात 135.8 मिमी. पाऊस, मूल 164 मिमी., गोंडपिपरी 30.5 मिमी., वरोरा 89 मिमी., भद्रावती 99.9 मिमी., चिमूर 74.7 मिमी., ब्रम्हपुरी 48.5 मिमी., नागभीड 51.6 मिमी., सिंदेवाही 143.4 मिमी., राजुरा 44 मिमी., कोरपना 46 मिमी., सावली 174.4 मिमी., बल्लारपूर 73.5 मिमी., पोंभुर्णा 114.8 मिमी., आणि जिवती तालुक्यात 34.1 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.