Akola News : अकोल्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहिम याच्या नावाचा उल्लेख असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यायालय परिसरात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र, संबंधित व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन करत कोर्ट परिसरातच व्हिडिओ शूट करून एक रील काढत तो सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर प्रसारित केला आहे. त्यामुळे न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचे नियम कितपत पाळले जात आहेत, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वादग्रस्त मजकुरामुळे दहशतीची चर्चा...
या व्हिडिओमध्ये 'पत्थर का जवाब हमेशा फूल से दो, और फूल उसके कबर मे होना चाहिए' असा वादग्रस्त मजकूर टाकण्यात आला आहे. या विधानामुळे अप्रत्यक्ष धमकी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. न्यायालय परिसरात अशा प्रकारचे संदेश प्रसारित होणे अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, संबंधित संशयित व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याचीही सूत्रांच्या प्राथमिक माहिती वरून समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
सायबर सेलवर दुर्लक्षाचे आरोप, कारवाईची मागणी..
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे सायबर सेल पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. न्यायालय परिसरातच नियमांचे उल्लंघन होत असल्याने अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. जेणेकरून पुन्हा असा प्रकार न्यायालय परिसरात घडणार नाही.