देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे हद्दीत हनुमान वस्तीजवळ एका नऊ वर्षाच्या मुलीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलीची लाकून कापण्याची मशीन गळ्यावर आणि डोक्यावर फिरवून हत्या केली आहे. अनामिका शांताराम चव्हाण असं मृत पावलेल्या ९ वर्षीय मुलीचं नाव आहे. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण आणि चिंगू शिंदबाद भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बाप झाला राक्षस...
मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारी साधारण ३.१५ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ९ वर्षांची अनामिका हिची तिच्याच बापाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. अनामिका हिने तिचा भाऊ संस्कार चव्हाण याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केली होती. त्यातच संतापलेल्या बापाने स्वत:च्या लेकीची अमानवीयपणे हत्या केली. त्याने अनामिकाच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर आणि गालावर लाकूड कापण्याची मशीन फिरवली. यानंतर अनामिका रक्तबंबाळ अवस्थेत घरात निपचित पडून होती. तिने जागीच जीव सोडला होता.
गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न...
आरोपीने स्वत:ची लेक अनामिकाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका कपड्यात गुंडाळला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वत:चं घर पेटवून दिलं. यावेळी आरोपी शांताराम चव्हाण याच्यासोबत चिंगू शिंदबाद भोसले नावाची महिला होती. तिनेही ही घटना कोणालाही सांगू नको असं सांगत घडलेला प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवला. पोलिसांना याबाबत माहिती मिळतात त्यांनी स्वतःहून पोलीस शिपाई निलेश फडणीस यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world