Indorikari Maharaj Viral Video: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अत्यंत शाही थाटात पार पडला. साखरपुड्यापासूनच हा विवाह सोहळा चर्चेत होता. अतिशय भव्यदिव्य पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावरून इंदोरीकर महाराजांवर टीका देखील करण्यात आली. पण इंदोरीकर महाराज यांनी आपल्या शैलीमध्ये ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलंय.
टीकाकारांना महाराजांचे सडेतोड उत्तर
"लोकांना साधेपणाचा सल्ला देणारे महाराज स्वतःच्या मुलीचे लग्न इतके मोठे का करतात?" असा प्रश्न विचारणाऱ्या ट्रोलर्सना इंदोरीकर महाराजांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले की,"साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा एक वर्षभर आरामशीर चालेल. बऱ्याच लोकांची जी शंका आहे की इंदोरीकर महाराजांनी मुलीचं लग्न एवढं मोठं का केलं? इंदोरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधेपणाने करा आणि स्वतः मुलीचं लग्न मोठं केलं तर त्याचं उत्तर असं आहे की ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय, ज्याच्यावर ज्ञानोबारायाची कृपा आहे, त्यानं जरूर करावं. दुसरी शंका लोकांना मठ्ठ्याबाबत होती, कारण मी मठ्ठ्यावर बोलतो, तर मठ्ठा मी माझ्या सर्व कार्यक्रमातून वजा केला. त्याबाबत तुम्हाला बोलण्याचे अधिकार नाहीत".
(नक्की वाचा: Mukesh Khanna Getting Married: 'फक्त पतिव्रता का? पत्नीव्रता का नाही?' मुकेश खन्नांचे अफेअर, गर्लफ्रेंड, लग्नावर रोखठोक विधान)
इंदोरीकर महाराज काय म्हणाले, ऐका VIDEO
भव्य नियोजन आणि मान्यवरांची उपस्थिती
दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी गुंजाळवाडी येथे तब्बल 10 एकर क्षेत्रात भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. सुमारे 3 लाख लोकांसाठी भोजन आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शाही सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, विवेक कोल्हे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
Photo Credit: NDTV Marathi
कधी पार पडला शाही विवाहसोहळा?
3 मे रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह संपन्न झाला. त्याआधी दोन तास हरीकीर्तनाचे आयोजन करून आध्यात्मिक वातावरणात या सोहळ्याची सुरुवात झाली. हळदी समारंभ आणि गुंजाळवाडीतील मुख्य सोहळा यामुळे हा विवाह 'राजेशाही' स्वरूपाचा ठरला.