क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी वापरली. तब्बल 15 बाय 15 फूट आणि 6.5 फूट उंच अशा तब्बल 2500 किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात 10 हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीकडून महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे राबविण्यात आला.
अयोध्येत तब्बल 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी 10 हजार किलो मिसळ तयार केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला.
उपक्रमामध्ये 10 हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी 1000 किलो, कांदा 800 किलो, आलं 200 किलो, लसूण 200 किलो, तेल 700 किलो, मिसळ मसाला 140 किलो, लाल मिरची पावडर 40 किलो, हळद पावडर 40 किलो, मीठ 50 किलो, खोबरा कीस 140 किलो, तमाल पत्र 7 किलो, फरसाण 2500 किलो, पाणी 10,000 लिटर, कोथिंबीर 125 जुडी, लिंबू 1000 नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश 50 हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास 50 हजार यासह स्लाईस ब्रेड 1.5 लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे.
पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या - वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून एकूण 20 हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.