रेवती हिंगवे, पुणे: पुण्यामध्ये सुरु असलेल्या विश्व मराठी संमेलनाची आज सांगता झाली. या सांगता समारंभाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच अभिनेते सयाजी शिंदे, रितेश देशमुख यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेबरोबरच मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.. असे म्हणत राज्य सरकारचे कान टोचले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राज ठाकरे?
"उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी बोलावलं माझे मित्र रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सगळी भाग्यवान माणसं. कारण त्यांना पुरस्कार मिळतो आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते," असे म्हणत राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.
"आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिले पाहिजे जग त्यानंतरच आपल्याला दाद देतात. जशी फ्रेंचची, इतर देशांमधील माणसं आहेत. ते आपल्या भाषेशी इतके प्रामणिक असतात त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला लागतो. बाकीचे जर आपल्या भाषेबद्दल इतकी अभिमान बाळगत असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलायला जातो. आपल्याकडील मुले- मुली हिंदी इंग्रजीमध्ये बोलायला जातात.. ते कशासाठी?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा
"आत्ता इथे जय जय महाराष्ट्र माझा गाणं लागलेलं. सांगा बरं भारतामध्ये कुठल्या राज्याचे राज्यगीत आहे? कोण म्हणत जयजय आसाम माझा.. जय जय गुजरात माझा.. फक्त जय जय महाराष्ट्र माझा.. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या हिंदप्रांतावर सगळी आक्रमण झाली ती बाहेरुन झाली. या भागावर राज्य फक्त मराठ्यांनी केले. बाकी कोणीही नाही, बाकीचे सगळे बाहेरुन आलेले," असंही राज ठाकरे म्हणाले.
ठआज बोलताना मराठी भाषा मंत्री यांनी मराठीसाठी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करु, असे आश्वासन दिले. मात्र जे जे आम्ही करु. त्यालाही पाठिंबा द्यावा. तेव्हा फक्त केसेस टाकू नका.. आत्तापर्यंतचा अनुभव सांगितला बाकी काही नाही.. कारण जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, बाकी कशासाठी नाही. मराठी भाषेबरोबरच मराठी माणसांचे अस्तित्वही टिकलं पाहिजे. तो टिकला तरच मराठी भाषा टिकेल, असे म्हणत राज ठाकरेंनी राज्यकर्त्यांचे कान टोचले.
तसेच माझी साहित्यिकांना माझी विनंती आहे, त्यांनी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पूर्वी साहित्यिकही बोलायचे, राजकीय विषयावर आपले मत मांडायचे. मात्र आता तशा गोष्टी दिसत नाहीत. साहित्यिकांनी बोललं पाहिजे. चांगलं काय वाईट काय सांगितलं पाहिजे. साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील... " असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.