निलेश बंगाले, प्रतिनिधी:
Attack On Police Wardha Crime News: वर्धा जिल्ह्याच्या सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी असे एकूण तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे पोलीस दलात तसेच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या पथकाला एका भागात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस कारवाई करत असताना आरोपी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याच दरम्यान, आरोपींनी पोलिसांवर तलवारीने अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस दलाने तातडीने पावले उचलली. राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि जखमी पोलिसांची विचारपूस केली.
वर्दीवर हल्ला करण्याची हिंमत दाखवल्याने आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांवरच अशा प्रकारे हल्ला होणे हा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गंभीर प्रश्न निर्माण करतो. या घटनेचा सखोल तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.