निलेश बंगाले, वर्धा: देशात सध्या बोगस मतदान याद्यांचा घोटाळा चर्चेत आहे. राहुल गांधी यांनी अनेक मतदार संघांमध्ये बोगस मतदान झाले असून हयात नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादींमध्ये टाकल्याचा आरोप केला आहे. हा वाद सुरु असतानच वर्धा भाजपमधील कार्यकारीणी नियुक्तीमधील सावळा गोंधळ समोर आला आहे. भाजपच्या कार्यकारिणीत वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या सदस्याचे नाव आल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय जनता पक्षाने वर्धा जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. मात्र या कार्यकारिणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या कार्यकारिणीत एका वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या सदस्याचे नाव दिले आहे. जगदीश चुरा असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याला जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या यादीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून टाकण्यात आले आहे. या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत सदस्याचे नाव यादीत टाकल्याचा प्रकार घडला कसा? यावर अद्याप भाजपकडून खुलासा करण्यात आला नाही. तसेच यादी देखील अपडेट करून जाहीर केली गेली नाही. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये मोठी चर्चा आणि नाराजी आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षाकडून अशी चूक होणं म्हणजे गंभीर समजले जात आहे. .आता सगळ्यांच्या नजरा भाजपच्या पुढील भूमिकेकडे लागल्या आहेत.
Political News : राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याचा आरोप; राज-उद्धव जवळीकीमुळे आघाडीत बिघाडी?