निलेश बंगाले, प्रतिनिधी
Wardha News : शिक्षण आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारे वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर यांच्या कुंभमेळ्यातील साधू-संतांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर वर्धा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिलेल्या तक्रारीनुसार,वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय म्हणाले होते कराळे?
कराळे मास्तरांनी नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीवर आणि शासनाकडून होणाऱ्या खर्चावर टीका केली होती. त्यांनी कुंभमेळ्यात येणारे साधू-संत गांजा फुंकण्यासाठी येत असल्याचा अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त दावा केला होता.
कुंभमेळ्यात साधू-संत गांजा फुंकणार नसतील, तर मी 10 लाख रुपये बक्षीस देईन, असे आव्हान त्यांनी दिले होते. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 29 महापालिका निवडणुकीचा मुहूर्त ठरला, मतदान, मतमोजणी कधी? वाचा A to Z माहिती )
गिरीश महाजन यांना आव्हान
याचबरोबर, नाशिकच्या कुंभमेळ्यावर राज्य सरकार अनावश्यक खर्च करत असल्याचा आरोपही कराळे मास्तरांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात येऊन गांजा फुंकणाऱ्या साधूंसाठी सरकारकडे 25 हजार कोटी रुपये खर्च करायला आहेत, पण गरीब मुले शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वार्षिक खर्चासाठी 2 हजार कोटी रुपयेही नाहीत. हा खर्च गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जावा, अशी त्यांची मागणी आहे.
या संपूर्ण वादात कराळे मास्तरांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना खुले आव्हान दिले आहे. "नाशिकच्या कुंभमेळ्यात साधू जर गांजा पिले नाहीत, तर मी 10 लाख रुपये बक्षीस देईन आणि जर ते साधू गांजा पीत असतील, तर त्यांनी (गिरीश महाजन यांनी) सत्ता सोडावी," असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.
याव्यतिरिक्त, कराळे मास्तरांनी निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी 'फोकनाड्या ताणल्या' (खोटे दावे केले) असल्याबद्दल त्यांच्या विरोधातही तक्रार नोंदवणार असल्याची माहिती आहे.