शाळेवर शिकवण्यासाठी चक्क स्वच्छता कामगाराची नियुक्ती करण्यात आली तर? तसा सरकारी आदेश निघाला असेल तर? त्यावर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. पण हे शक्य आहे. आपली सरकारी यंत्रणेचा कारभार पाहात तसं होवू शकतं आणि तसं झालं आहे. ही घटना घडली आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगावमध्ये. पुलगाव नगर परिषदेने शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क स्वच्छता कामगाराची नियुक्ती केली आहे. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. या आदेशाची प्रत आता जोरदार व्हायरल होत आहे.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा धुरळा अजून खाली बसलेला नसताना सफाई कामगाराची नियुक्ती विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. वर्धाच्या पुलगाव नगरपरिषदेत हा प्रकार घडला आहे. नगरपरिषद आस्थापनेवरील कार्यरत असलेले कर्मचारी स्थानांतरण करण्या बाबतचा एक आदेश काढण्यात आला आहे.
त्यात म्हटलं आहे की पुलगांव नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटसंख्येनुसार शाळेत शिक्षक कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते होवू नये या करता शाळेतील शिक्षक सेवक आणि स्वच्छता विभागातील सफाई कामगार यांचे स्थानांतरण करण्यात येत आहे असे नगरपरिषदेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशा द्वारे एका सफाई कर्मचाऱ्याला विद्यार्थांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
चेतन रमेश चंडाले हे पुलगांव नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात काम करतात. ते सफाई कर्मचारी आहेत. नगरपरिषदेने जो आदेश काढला आहे त्यात असे नमुद करण्यात आले आहे की शहीद भगतसिंग प्राथ. शाळा क्र. 4 सदर नियुक्ती अतिरिक्त स्वरुपात शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्या करता करण्यात येत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला अनुज्ञेय राहणार नाही. तसेच मुळ आस्थापनेवर कोणताही बदल होणार नाही असे नमुद करण्यात आले आहे. शिवाय आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असा शेरा मारण्यात आला आहे. हे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमाप आश्रमा यांनी काढला आहे. या आदेशाची सगळीकडे चर्चा आहे.