एकीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. मतं मागण्यासाठी नेते गल्लोगल्ली फिरत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत आहेत. पण जे प्रश्न समोर दिसत आहेत त्यावर मात्र काहीच उपाय योजना नाहीत. सोलापूर जिल्ह्यातलं असचं एक गाव आहे. त्या गावतले लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं.
पाण्यासाठी करावी लागते वणवण
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी हे गावय या गावाची लोकसंख्या जवळपास 15000 हजाराच्या घरात. या गावांमध्ये पाणी प्रश्न प्रचंड बिकट आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर जावं लागत आहे. ग्रामपंचायत आठ ते दहा दिवसाला एकदा पाणी सोडत असते. तेही फक्त पंधरा मिनिटांसाठी सोडलं जातं. ते पाणी किती जणांना पुरणार असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे. मोठ्या कुटुंबानी काय करायचा हाही प्रश्न आलात. अजून मे महिना यायचा आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न अजून गंभिर बनणार आहे. मे महिन्यापर्यंत निवडणुकाही आटपतील. त्यानंतर गावकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार अशी विचारणा गावकरीच करत आहेत.
शाळेत न जाता भरावं लागतं पाणी
कुंभारी गावची पाण्याची स्थिती इतकी गंभिर आहे की त्याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवरही झाला आहे. ज्या दिवशी गावात पाणी येणार आहे किंवा टँकर येणार आहे त्या दिवशी विद्यार्थी शाळेत जात नाही. जास्तीत जास्त पाणी घरात साठवता यावं यासाठी हे विद्यार्थी घरी पाणी भरतात. तर कधी गावाच्या बाहेर दोन किलोमिटर पायपीट करून पाणी घरा पर्यंत आणतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. पण त्याला नाईलाज असल्याचं गावकरी सांगत आहेत. शिखर युथ फाऊंडेशनच्या वतीने दररोज एक वार्डामध्ये एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून 450 टँकर पाणीपुरवठा केलेला आहे.
पुढारी याकडे लक्ष देतील का?
निवडणुक तोंडावर आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात आहे. एकीकडे सुर्य तापला असताना दुसरीकडे राजकीय वातावरणही तापलं आहे. पण यासर्वामध्ये असे काही प्रश्न आहेत, ते सर्व सामान्यांसाठी मुलभूत आहेत. देशाच्या राजकारणाची चर्चा केली जाते. पण ज्यांना प्यायलाही पाणी नाही. पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देणार आहे का हा खरा प्रश्न आहे. निवडणूक होईल. मतदान होईल. निवडूनही येतील. पण कुंभारी सारख्या गावांच्या मुलभूत प्रश्नाचं काय? त्याचं उत्तर राजकारणी देणार आहेत का? त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहेत का? की त्यांनी दहा दहा दिवस पाण्याची वाटच पाहात राहायची. उन्हातान्हातून दोन दोन किलोमिटरची पायपीट करतच राहायची का? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं तरी कुंभारीवासीयांची समस्या सोडवली जावी ही गावकऱ्यांची आपेक्षा आहे.