
सूरज कसबे
पिंपरी-चिंचवडमध्ये एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. इथल्या आकुर्डी परिसरात असलेल्या प्रेमलोक भागामध्ये चमत्कार पाहायला मिळाल्याची इथल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज वाढली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागामध्ये रस्त्याच्या कडेला पिंपळाचे झाड आहे. शुक्रवारी रात्री या झाडातून अचानक धो-धो पाणी बाहेर येऊ लागले. हा चमत्कारीक प्रकार पाहून हे झाड पाहण्यासाठी लोकं जमा होऊ लागली.
पिंपळाच्या झाडातून पाणी येत असल्याचे डोळ्यांनी पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच मोबाईल फोन बाहेर काढले आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. व्हिडीओ काढण्यापूर्वी यातील काहीजणांनी आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांना फोन करून या 'चमत्काराची' रसभरीत कहाणी सांगितली. काहींनी आपापल्या परीने या चमत्कारामागचा अर्थ काढत तो इतरांना सांगितला. थोडाचवेळात इथे काही जण आले आणि या चमत्काराला नमस्कार करण्यास सुरुवात केली.
झाडातून पाणी येऊ लागल्यानंतर काहींनी त्यात हातपाय धुवून घेतले. काहींनी डोक्यावर शिंपडलं आणि सांगितलं की या पाण्यामुळे डोकं थंड राहातं. काहींनी झाडाभोवती रांगोळ्या काढल्या. काहींना वाटत होतं की झाडाच्या आत देव असावा.
नक्की वाचा : ‘मिसिंग लिंक' कधी सुरू होणार?
पिंपळाच्या झाडातून पाणी येत असल्याची घटना या परिसरात कुठेही पाहायला मिळाली नव्हती. यामुळे काही महिला-पुरूष या पिंपळाच्या झाडाची पूजा करू लागले. काहींनी या पिंपळाला हळद-कुंकू वाहिले, काहींनी पूजा केली तर काहींनी या झाडाला हार चढवले. काही सुजाण नागरिकांनी हा प्रकार आपल्या जवळच्या लोकांना न कळवता तो अग्निशमन दलाच्या जवानांना कळवला. अग्निशमन दलाचे जवानही तातडीने घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी नीट पाहणी केली असता झाडाच्या खाली पाईपलाईन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार पाणीपुरवठा विभागाला कळवला. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तिथे आले आणि त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा : 'बायको त्रास देते,मारहाण करते', Video शूट करुन नवऱ्यानं संपवलं आयुष्य
पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले की झाडाच्या खालून एक पाईपलाईन जात असून तिला गळती लागली आहे. गळतीमुळे बाहेर येणाऱ्या पाण्याला बाहेर पडण्याची झाडाचा बुंधा ही एकमेव वाट होती, ज्यामुळे झाडाच्या बुंध्यातून पाणी झरू लागलं होतं. हा सगळा प्रकार कळाल्यानंतर लोकांमधील उत्सुकता कमी झाली आणि या झाडाभोवती जमलेली गर्दी हळूहळू कमी झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world