सूरज कसबे
पिंपरी-चिंचवडमध्ये एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. इथल्या आकुर्डी परिसरात असलेल्या प्रेमलोक भागामध्ये चमत्कार पाहायला मिळाल्याची इथल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज वाढली आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागामध्ये रस्त्याच्या कडेला पिंपळाचे झाड आहे. शुक्रवारी रात्री या झाडातून अचानक धो-धो पाणी बाहेर येऊ लागले. हा चमत्कारीक प्रकार पाहून हे झाड पाहण्यासाठी लोकं जमा होऊ लागली.
पिंपळाच्या झाडातून पाणी येत असल्याचे डोळ्यांनी पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच मोबाईल फोन बाहेर काढले आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. व्हिडीओ काढण्यापूर्वी यातील काहीजणांनी आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांना फोन करून या 'चमत्काराची' रसभरीत कहाणी सांगितली. काहींनी आपापल्या परीने या चमत्कारामागचा अर्थ काढत तो इतरांना सांगितला. थोडाचवेळात इथे काही जण आले आणि या चमत्काराला नमस्कार करण्यास सुरुवात केली.
झाडातून पाणी येऊ लागल्यानंतर काहींनी त्यात हातपाय धुवून घेतले. काहींनी डोक्यावर शिंपडलं आणि सांगितलं की या पाण्यामुळे डोकं थंड राहातं. काहींनी झाडाभोवती रांगोळ्या काढल्या. काहींना वाटत होतं की झाडाच्या आत देव असावा.