Maharashtra Rain News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामानात होत असलेल्या या बदलांमुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी १३ ते २० ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, २० ते २७ ऑगस्ट दरम्यान देखील राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची ही रिमझिम आणि जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Success Story: 18 लाखांची नोकरी सोडली, गावातच थाटला 'हा' व्यवसाय; आता लाखोंची कमाई!
राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ!
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार, दक्षिण पश्चिम बंगाल आणि त्याला लागून असलेल्या बांगलादेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील चोवीस तासांत पश्चिम बंगालची किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार होणार आहे. या हवामान बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या हालचालींवर होणार असून, आगामी काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सून पुन्हा सक्रिय होईल.
दुसरीकडे, पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ८२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या चालू मान्सून हंगामात महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत तब्बल ५ हजार १६ मिलीमीटर एवढा तुफान पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यामुळे परिसरातील निसर्गसौंदर्य आणखीनच खुलून आले आहे.
देशातील इतर राज्यांमध्येही मुसळधार पाऊस
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील इतरही काही राज्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. ओडिशाच्या काही भागांत अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच केरळ, कर्नाटक (किनारपट्टी व दक्षिण भाग), पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान या राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world