What is Dhawara Mutton: इन्टाग्राम, फेसबूक सुरु केलं की यावंच लागतंय आणि ढवारा स्पेशल मटण थाळी हे दोन शब्द वारंवार ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर या ढवारा स्पेशल मटण थाळीने अक्षरश:धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात विशेषत: धाराशिव जिल्ह्यामधील हॉटेल्समध्ये या ढवारा स्पेशल थाळीने मटणप्रेमी, नॉनव्हेज प्रेमींना वेड लावलं आहे.
हॉटेल तिरंगा (Hotel Tiranga), हॉटेल भाग्यश्री (Hotel Bhagyashree), हॉटेल 7777, हॉटेल अंबादास या सोशल मीडियावर तुफान चर्चा असणाऱ्या होणाऱ्या ढाब्यांवर याच स्पेशल थाळीसाठी जोरदार गर्दी होत असते. पण मटणप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेली ही ढवारा स्पेशल मटण थाळी म्हणजे नेमकं काय? त्याची रेसिपी कशी असते? अन् काय आहे त्याची खासियत? जाणून घ्या...
ढवारा मटण म्हणजे काय? (What Is Dhawara Mutton)
महाराष्ट्रात प्रत्येक भागात मटण बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोल्हापूर- सांगलीमध्ये ज्या पद्धतीने तांबडा- पांढरा रस्सा फेमस आहे. तशीच आणखी एक स्पेशल डीश म्हणजे ढवारा मटण थाळी. ढवारा स्पेशल मटण थाळी म्हणजे मराठवाड्यातील एक पारंपरिक पद्धतीची मटणाची थाळी. यात देवी-देवतांना नैवेद्य म्हणून वाहिले जाणारे मटण खास पद्धतीने बनवले जाते.
ढवारा मटण कसं बनवतात? (Dhawara Mutton Recipe)
सहसा आपण मटण आणून त्याला शिजवतो आणि त्यानंतर भाजी बनवतो. मात्र ढवारा मटण थेट तुकडे करुन त्याची भाजी बनवतात, ज्यामुळे त्याची चव बदलते. यात अख्खा बोकड कापून त्याची भाजी बनवतात आणि ती मोठ्या भांड्यात किंवा हंड्यात शिजवतात, ज्यामध्ये मसाले आणि इतर साहित्य वापरले जाते. त्याला कंदुरी मटण असेही म्हणतात. मराठवाड्यांमध्ये यात्रा- जत्रांमध्ये ढवारा मटण केले जाते. एकाचवेळी संपूर्ण बोकड कापून त्याचे मोठे मोठे तुकडे करुन शिजवले जातात आणि ते गावात वाटले जाते. झणझणीत मसाला आणि मोठे पीस करुन शिजवण्याच्या पद्धतीने ढवारा मटण वेगळे ठरते.
तसेच मराठवाड्यामध्ये शेतात ज्वारीची मळणी करत असताना ज्वारीची रास खळ्यामध्ये पडायची. त्याच्या रक्षणासाठी शेतात मुक्काम करावा लागायचा. त्यासाठी जी मंडळी शेतावर मुक्कामाला असे, त्यांच्यासाठी आणि इतर मित्र , नातेवाईक यांना रात्रीच्या वेळी खास जेवण बनवले जाई त्यालाही ढवारा असे म्हणतात. सातारा जिल्ह्यामध्ये त्यालाच पाल जत्रा असेही म्हणतात.