सुनील कांबळे, प्रतिनिधी
गणेश उत्सव असो की महापुरुषांची जयंती.... डॉल्बी, डीजेला मोठं महत्त्व दिल जातं... बेस वर बेस चढवून प्रचंड आवाज करणाऱ्या डीजेच्या दणदणाटामध्ये मिरवणूका काढल्या जातात. 'आवाज वाढव DJ तुला...' म्हणत कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचतात. त्यांची मंडळं एकेमकांशी आवाजाची स्पर्धा करतात. जयंती मिरवणुकीमध्ये या डॉल्बीनं तरुणाईला वेड लावलंय. डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकताना आपण अनेकदा पाहतो. क्षणभराच्या या धुंदीसाठी आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी काही जणांवर येते. त्यामुळेच डीजे बंद करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. संपूर्ण देशात शिक्षण क्षेत्रामध्ये 'लातूर पॅटर्न' राबवणाऱ्या लातूर शहरामध्ये ही मागणी होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे मागणी?
डीजे किंवा डॉल्बीला परवानगीच देऊ नये अशी मागणी आता लातूरकरांकडून होत आहे. डीजेला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.डीजे मुक्तीसाठी लातूरकर आता एकवटले आहेत.. डीजे मुक्तीची संकल्पना गणेश उत्सवापासून व्हावी अशी मागणी लातूरकरांमध्ये जोर धरतीय.
कुणी घेतला पुढकार?
डीजे मुक्त लातूर करण्यासाठी दिशा फाउंडेशन आणि शहरातील डॉक्टर्स मंडळींनी पुढाकार घेतला आहे. डीजे मुक्तीची जागरुकता निर्माण व्हावी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष स्टेज लावतात तेव्हा गोंधळ अधिक वाढतो. स्वागत स्टेज समोर लावलेल्या डीजे डॉल्बी देखील अधिक हानिकारक आहे, असं मत दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी NDTV मराठी शी बोलताना व्यक्त केलंय.
लातूर डीजेमुक्त करण्यासाठी शहरातील गणेश मंडळ देखील पुढे सरसावलेत. लातूर शहरात शेकडो गणेश मंडळ आहेत. त्यापैकीप्रमुख गणेश मंडळ या डीजेमुक्तच्या चळवळीत सक्रिय सहभागी आहेत.... येत्या काळात सर्वच गणेश मंडळांना यामध्ये सहभागी करण्याची माहिती गणेश मंडळाचे सदस्य महेश कोळ्ळे यांनी दिली.
( नक्की वाचा - गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम )
काय होतो परिणाम ?
'डीजेच्या आवाजामुळे बहिरेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. डीजे, डाॅल्बी आणि कानातील हेडफोनमुळे देखील हे प्रमाण वाढतं. मागील चार वर्षांपासून या प्रकारातील रुग्णांची संख्या वाढतीय. आपले कान 80 डेसिबल पर्यंत चा आवाज सहन करु शकतात . त्या पुढील आवाज कान सहन करु शकत नाहीत,' असे डॉ. आनंद गोरे यांनी स्पष्ट केले.
डीजे किंवा डॉल्बीच्या आवाजामुळे अनेक रुग्णांना कानाचा बहिरेपणा डोळ्याला अंधत्व आणि हृदयाचे आजार निर्माण झाल्याचं समोर आले आणि त्यामुळेच आता लातूर मधून डीजे मुक्तीची मागणी करण्यात येते... शहरातील सर्व सण उत्सव आता डीजे मुक्त करून लातूरमध्ये पुन्हा एकदा डीजे मुक्तीचा देशात नवीन पॅटर्न निर्माण करण्याचा लातूरकरांचा प्रयत्न आहे.