जाहिरात

Sanjay Bhende: भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिली ते 'भेंडे मास्तर'कोण ? ; गडकरींचे 'चाणक्य' आता सभागृहात!

Maharashtra MLC Election 2026: नागपूरच्या राजकारणात 'भेंडे मास्तर' म्हणून ओळखले जाणारे संजय भेंडे नेमके कोण आहेत आणि भाजपने त्यांच्यावर हा विश्वास का दाखवला, हे जाणून घेणे रंजक आहे.

Sanjay Bhende: भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिली ते 'भेंडे मास्तर'कोण ? ; गडकरींचे 'चाणक्य' आता सभागृहात!
Sanjay Bhende: विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक कामात त्यांचा मोठा वाटा आहे.
नागपूर:

Maharashtra MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या निष्ठावंत चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे प्राध्यापक संजय भेंडे. नागपूरच्या राजकारणात 'भेंडे मास्तर' म्हणून ओळखले जाणारे संजय भेंडे नेमके कोण आहेत आणि भाजपने त्यांच्यावर हा विश्वास का दाखवला, हे जाणून घेणे रंजक आहे.

कोण आहेत संजय भेंडे?

संजय भेंडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. 2014 पासून नागपूर लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करण्याची मुख्य जबाबदारी भेंडे यांनीच सांभाळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत वाढलेले भेंडे हे अत्यंत शिस्तप्रिय आणि मितभाषी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक कामात त्यांचा मोठा वाटा असून, पडद्यामागे राहून सूत्रे हलवण्यात ते माहीर आहेत.

सहकार क्षेत्रात दबदबा आणि 'बँकर' अशी ओळख

राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही संजय भेंडे यांचे मोठे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. एका यशस्वी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची 'बँकर' अशी ओळख असली तरी, मुळात ते एक शिक्षक म्हणजेच प्राध्यापक आहेत. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांनी काम आहे, त्यामुळेच आजही कार्यकर्ते त्यांना आदराने 'भेंडे मास्तर' म्हणूनच हाक मारतात.

(नक्की वाचा : Amravati News: अमरावतीमध्ये चायनीजच्या गाड्यांवरून लव्ह जिहादाचा कट? भाजपा खासदारांच्या 5 मोठ्या मागण्या )

जातीय समीकरणे आणि ओबीसी चेहरा

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी या वेळी अनेक मोठी नावे चर्चेत होती. ब्राह्मण समाजातून उपेंद्र कोठेकर किंवा दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा सुरू होती, तर फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे संजय बंगाले यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, भाजपने ऐनवेळी ओबीसी कार्ड खेळत संजय भेंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जातीय समीकरणे साधण्यासाठी आणि निष्ठावान ओबीसी कार्यकर्त्याला सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

संजय भेंडे सध्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूर शहराचे सरचिटणीस आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही काम केले आहे. कोणताही गाजावाजा न करता संघटनेने दिलेली जबाबदारी चोख पार पाडणे, ही त्यांची जमेची बाजू ठरली. पराभूत नेत्यांना बाजूला सारून संघटनेतील नव्या आणि कामाच्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या भाजपच्या नवीन धोरणाचा भेंडे यांना मोठा फायदा झाला आहे.

येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांपैकी संजय भेंडे आता विधान परिषदेत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या रूपाने नागपूरच्या एका 'मास्तरांना' आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहात आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com