Marathi language : शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम असतानादेखील मुंबईतील एका वाहतूक पोलीस हवालदाराने एका महिला प्रवाशाला असा कोणताही नियम नसल्याचे सांगत तिच्याशी हुज्जत घातल्याची घटना बुधवारी घडली आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभं असलेलं त्यांचं वाहन ओढून नेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यावेळी त्या गाडीजवळ पोहोचल्या असता पी. एन. साबळेहे हवालदार तिथे होते. त्यांच्याकडील स्पीकरमधून हिंदीमध्ये उद्घोषणा करत असल्याचे त्यांना जाणवले. या उद्घोषणा हिंदीतून केल्या जात होता. यावर अनुप्रिया देसाई यांनी पोलीस हवालदाराला सवाल केला. तुम्ही मराठी घोषणा का करत नाहीत, अशी विचारणा अनुप्रिया देसाई त्यांना सातत्याने करीत होते. त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचे साबळे यांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याकडील स्पीकरमध्ये तांत्रिक बदल केल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.
काही दिवसांपूर्वी पवईतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मराठी भाषेबद्दल अपशब्द उच्चारल्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. मूळचा उत्तर भारतातील असलेल्या या सुरक्षा रक्षकाला मराठी बोलता येत नव्हतं. मात्र त्याबाबत किंचितशीही लाच न बाळगता 'मराठी गया तेल लगाने' असं म्हणाला होता. मुळे मनसैनिकांनी त्याचा भरचौकात समाचार घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी अद्यापही मुंबई किंबहुना महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांकडून मराठीचा अपमान केला जात आहे.