Why Sunetra Pawar Wasn't Given Finance Ministry?: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अजित पवारांकडील सर्वात ताकदवान मानले जाणारे अर्थ मंत्रालय सुनेत्रा वहिनींना का मिळाले नाही? राज्याच्या राजकारणात अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या रूपाने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असली, तरी त्यांच्याकडे देण्यात आलेल्या खात्यांमुळे ही चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता यामागचे नेमके आणि धक्कादायक कारण समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी यावरचा पडदा हटवला आहे.
सुनेत्रा पवार यांना अर्थ मंत्रालय का नाही?
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची निवड झालीय. 31 जानेवारी 2025 रोजी त्यांनी या पदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्याकडे क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास ही खाती सोपवण्यात आली. दादांकडील अर्थ व नियोजन मंत्रालय त्यांच्याकडे का दिले नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती.
प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट अगदी तोंडावर आहे. सुनेत्रा पवार या मंत्रिमंडळात नवीन आहेत आणि अर्थसंकल्पासारखी मोठी जबाबदारी हाताळताना त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, असा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडला. मी काही काळ हे मंत्रालय सांभाळतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे.
( नक्की वाचा : PMC Mayor: पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे कोण आहेत? अजित पवारांच्या शब्दानं कसं बदललं संपूर्ण गणित )
निर्णय प्रक्रियेवरून विरोधकांना टोला
सुनेत्रा पवार यांच्या निवडीबाबत बाहेरून टीका करणाऱ्यांना प्रफुल पटेल यांनी चांगलेच सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ नेता कोण असावा, हा पूर्णपणे पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा ताईंच्या नियुक्तीचा निर्णय घाईत घेतल्याचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना पटेल म्हणाले की, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आम्ही पार्थ आणि जय पवार यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा पाठिंबा दर्शवला होता. जनतेची आणि कार्यकर्त्यांची भावना होती की पवार कुटुंबातील व्यक्तीने ही जबाबदारी स्वीकारावी, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार गहिवरल्या, उपमुख्यमंत्री झाल्यावर दिली भावुक प्रतिक्रिया )
अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही
पक्षामध्ये फूट पाडण्याचा किंवा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रफुल पटेल यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. जे लोक कधी निवडणुकीत उभे राहिले नाहीत, ते आमच्या निर्णयावर भाष्य करत आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
एका केंद्रीय मंत्र्याने चुकीची माहिती मिळाल्यामुळे विधान केले असावे, मात्र विधिमंडळ प्रक्रियेचे पालन करण्याची जबाबदारी आपली आणि सुनील तटकरे यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी मोठे विधान केले असून, योग्य व्यक्तीची निवड केली जाईल आणि आपण स्वतः त्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world