राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी परिसरात एका व्यक्तीला विष देऊन मारल्याप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या दोन नातेवाईकांसह एकूण तिघा जणांवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुप्रताप रामनिवास असे मृताचे नाव असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, भानुप्रताप रामनिवास यांचे त्यांची पत्नी शर्मिला मनीराम यांच्यासोबत सातत्याने घरगुती कारणावरून भांडण होत होते. याच सततच्या वादातून पत्नीने तिच्या दोन नातेवाईकांच्या मदतीने भानुप्रताप यांना विषारी पदार्थ पाजून त्यांचा खून केल्याचा आरोप भानुप्रताप यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर गाडी थांबताच नवरी फरार; शेतकरी नवऱ्याची लाखोंची फसवणूक)
पोलिसांनी ज्या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे, त्यात भानुप्रताप यांची पत्नी शर्मिला मनीराम, मनीराम कल्लुराम आणि मनीराम यांची पत्नी यांचा समावेश आहे. 20 जून 2025 रोजी संशयित मनीराम याने भानुप्रताप यांचे वडील श्रीराम श्रीपाल निवास यांना फोन करून भानुप्रताप यांचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे कळवले होते.
भानुप्रताप यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांना विष पाजून मारले असल्याचा संशय त्यांच्या वडिलांनी, श्रीराम निवास यांनी व्यक्त केला. या संशयाच्या आधारावर त्यांनी उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यातील तिकोनियाँ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संशयितांविरुद्ध शून्य नंबरने गुन्हा दाखल केला. हत्येची घटना रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने, तिकोनियाँ पोलिसांनी या गुन्ह्याची कागदपत्रे 18 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग केली. कागदपत्रांच्या आधारावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत संशयित पत्नी शर्मिला मनीराम, मनीराम कल्लुराम आणि मनीराम यांच्या पत्नीसह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.