नागिंद मोरे, धुळे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मेथी गावात राहणाऱ्या लक्ष्मी विनोद वडार या महिलेने झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने स्वतःचा एक व्हिडिओ बनवला होता.
या व्हिडिओमध्ये तिने आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तसेच, तिने आपल्या काही नातलगांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिच्या काही नातलगांनी तिला अश्लील शिवीगाळ केली, तसेच तिला जबर मारहाण केली, असे तिने व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
(नक्की वाचा- Purandar Airport: पुरंदर विमानतळावरून पुन्हा वाद पेटला, शेतकऱ्यांचा 'हा' निर्णय सरकारची डोकेदुखी वाढवणार)
14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर मृत महिलेचे पती विनोद वडार यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड हे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या आत्महत्येमागील नेमके कारण आणि व्हिडिओतील आरोपांची सत्यता तपासणीअंती समोर येईल.