जनता पूरपरिस्थितीमुळे त्रस्त, भाजप आमदार नाच-गाण्यात व्यस्त; गौतमीसोबतचा VIDEO Viral 

उमरखेडमध्ये मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी देखील हजेरी लावली. 

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. शेतकऱ्यांचं देखील या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहेत. एकीकडे नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी नाच-गाण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

झालं असं की, यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलसोबत नाच गाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले आहे. नेहमी चर्चेत राहणारे आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी गौतमी पाटीलसोबत ठेका धरला. 

उमरखेडमध्ये मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी देखील हजेरी लावली. 

Advertisement

यवतमाळची जनता पूरपरिस्थितीमुळे हाल सोसत असताना संदीप धुर्वे गौतमी पाटीलसोबत नाच-गाणं करताना दिसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपला शेतकरी आणि जनतेच्या अडचणींशी देणे-घेणे नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ‘मिशिवाल्या आमदाराला गौतमी पाटील सोबत नाचण्याचा मोह आवरला नाही', अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. 

भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की,  "यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले.  अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे."

Advertisement

"झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या - शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे", असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 
 

Topics mentioned in this article