उल्हासनगर: उल्हासनगर शहरात क्रीडांगणं व्हावीत, चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं एका तरुणानं 100 किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे. वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर 10 तास 20 मिनिटांत पूर्ण करत स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केला आहे. या तरुणाच्या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
Viral Video : "प्लीज गाडी थांबवा, माझी मुलगी सोबत आहे", कॅबमध्ये कुटुंबासोबत काय घडलं?
राकेश खापरे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रात्री बारा वाजता त्यानं वांगणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 100 किलोमीटरच्या रनला सुरुवात केली. वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर त्यानं सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केले.
उल्हासनगर सारख्या शहरात क्रीडांगण नाहीत, खेळाडूंना सोयी सुविधा नाहीत. त्यासाठीच त्यानं हे 100 किलोमीटरचं लक्ष निर्धारित केलं होतं. या मॅरेथॉनसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होता. दररोज 20 किलोमीटर धावण्यासोबत पोषक आहारावर त्यानं भर दिला. सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळ खेळायला हवेत. तसच मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहायला हवं असा संदेशही राकेशनं यानिमित्ताने दिला आहे.