लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवारांचा विश्वास दुणावला आहे. आता विधानसभेत जोरदार मुसंडी मारण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यात ते आता अजित पवारांना एकामागून एक धक्के देत आहेत. पिंपरी चिंचवड हा तसा अजित पवारांचा गड समजला जातो. मात्र हा गडच भेदण्याचा चंग शरद पवारांनी बांधला आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे जवळपास 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात आहे. शिवाय अजित पवारांचे अतिशय जवळचे नेते विलास लांडे हेही शरद पवारांना भेटणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचडवमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शरद पवारांनीही याला दुजोरा दिल्याने अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरीचे 16 नगरसेवकर फुटणार?
पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा गड मानला जातो. या ठिकाणी अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय कार्यकर्त्यांची मजबूत फळी देखील आहे. त्यांनी एकहाती सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेत आणली होती. आता याच गडाला तडा जाण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास 16 नगरसेवक अजित पवारांना बायबाय करण्याच्या तयारीत आहेत. या नगरसेवकांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. शिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची इच्छाही व्यक्त केली. यांच्या बरोबर अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे विलास लांडेही शरद पवारांना भेटणार आहेत. त्यामुळे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे प्रवेश शरद पवारांना ताकद देणारे ठरतील. तर अजित पवारांचे पाय आणखी खोलात जातील.
ट्रेंडिंग बातमी - ट्रेंडिंग बातमी - सुजाता सौनिक इतिहास रचणार? महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता
शरद पवारांनीही दिला दुजोरा
दरम्यान पिंपरी चिंचवडचे नगरसेवक आपल्याला येवून भेटले आहेत. त्यांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. हल्ली मला रोज दोन- तीन तास काढावे लागतात. नवीन लोकं पक्षात येणारे आहेत. त्यांना भेटालं लागतं. नव्या पिढीतल येणाऱ्या लोकांचे आम्ही जरूर स्वागत करू. त्यांना ताकद देवू असे शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे जवळपास 16 नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. हे सर्व नगरसेवक शरद पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी भेटले होते.