जाहिरात
This Article is From Apr 04, 2024

शिंदेंच्या खासदाराचा राजकीय बळी का? मोठं कारण आलं समोर

शिंदेंच्या खासदाराचा राजकीय बळी का? मोठं कारण आलं समोर
Mumbai:

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखलही केले आहेत. तर अनेक इच्छुकांच्या पदरी उमेदवारी न मिळाल्यानं निराशा हाती लागली आहे. पण राज्यातील असे एक खासदार आहेत ज्यांची उमेदवारी जाहीर झाली. पण काही दिवसातच त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या या नेत्यालाही बाब धक्का देणारीच होते. हे खासदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे हेमंत पाटील. हिंगोलीचे खासदार. आता त्यांची जाहीर झालेली उमेदवारी का रद्द झाली याची चर्चा सुरू झाली आहेत. त्यातून तीन मोठी कारणं समोर आली आहेत. या तीन कारणांमुळेच हेमंत पाटील यांना आपली जाहीर झालेली उमेदवारी गमवावी लागली. 

मला उमेदवारी जाहीर झाली होती. जर उमेदवारी रद्दच करायची होती तर ती जाहीर करायला नको होती. पण काही अडचणी असतात. मी शिंदेंचा कार्यकर्ता आहे. ही जागा निवडून आपण्यासाठी मी प्रयत्न करणार

हेमंत पाटील

नेते, शिवसेना (शिंदे गट )

काय आहेत ती 3 कारणं? 

1)  जनतेशी तुटलेली नाळ

हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत. हिंगोलीचे खासदार होण्या आधी ते नांदेड दक्षिणचे आमदार होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना २०१९ ला शिवसेनेकडून खासदारकीची उमेदवारी दिली. हिंगोलीतून ते निवडूनही आले. पुढे शिवसेनेत फुट पडलीय पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. या कालावधीत पाटील यांचा मतदार संघाशी असलेला संपर्क कमी झाला. ते  मतदार संघात कमी आणि मुंबईत जास्त असा त्यांच्यावर आरोप होवू लागला. आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेवर ते होते. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमही त्यांनी मतदार संघात घेतले. पण ते त्यानंतरही मतदार संघात सक्रीय नव्हते असाही आरोप होत आहे. अनेक वेळा विचारणा केल्यानंतरही ते मतदार संघाच्या बाहेर आहेत असचं सांगितलं जात असे. त्यामुळे पाटील यांच्याबाबत स्थानिक पातळीवर नाराजी होती. हे एक कारण त्यांना त्यांची उमेदवारी गमावताना कारणीभूत ठरलं आहे अशी जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा - काँग्रेसची लाज वाचवणाऱ्या मतदारसंघात यंदा काय होणार? भाजपाकडून तगडं आव्हान 

2) भाजप नेत्यांबरोबर जुळवून घेण्यात अपयश 

हिंगोली लोकसभा भाजपनं लढवावी अशी स्थानिक पातळीवर मागणी होती. भाजप नेते रामदास पाटील सुमठानकर हे मतदार संघात फिरत ही होते. हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपमध्ये नाराजी पसरेल अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती. पक्षाच्या आढावा बैठकीतही त्यामुळे गोंधळ झाला होता. यावेळी पक्षाचे आमदार भीमराव केराम, नामदेव ससाणे, तान्हाजी मुटकुळे उपस्थित होते. कोणत्याही स्थितीत पाटील उमेदवार नकोत ही भाजपची मागणी होती. भाजपकडून होणारा मोठ्या प्रमाणातला विरोध हेमंत पाटील यांना शमवता आला नाही. त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाबरोबर जुळवूनही घेतलं नाही. त्याचा फटका हेमंत पाटील यांना बसला. जर पाटील उमेदवार असतील तर त्यांचा पराभव नक्की आहे हा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मेसेज  मुख्यमंत्री शिंदे पर्यंत पोहचवण्यात आला. भाजपमध्ये पाटील यांच्या विषयी असलेली नाराजी लक्षात घेता शिंदे यांच्या पुढेही कोणता पर्याय राहीला नाही. शेवटी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

हे ही वाचा- गडचिरोलीची लढत कोणासाठी डोकेदुखी?

3) आपल्याच सरकार विरोधात घेतलेली भूमिका 
    
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता. सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक होतं. अशा वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राजीमाना देत त्यांनी एक प्रकारे सरकार विरोधातच भूमिका घेतली होती. सरकार आरक्षण देण्याबाबत अनुकूल असतानाही पाटील यांनी अशी भूमिका घेणं भाजपच्या नेत्यांना पटलं नव्हतं. ही बाबही पाटील यांना उमेदवारी गमावण्यास भारी पडली अशीच चर्चा सध्या सुरू आहे.        

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com