जाहिरात

Abu Azmi : अबू आझमींकडून मराठीचा अपमान; 'ये भिवंडी है...' म्हणत उधळले अकलेचे तारे

Abu Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Abu Azmi : अबू आझमींकडून मराठीचा अपमान; 'ये भिवंडी है...' म्हणत उधळले अकलेचे तारे
मुंबई:

सागर जोशी, प्रतिनिधी 

Abu Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भिवंडीमध्ये मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काय म्हणाले आझमी?

भिवंडीतील कल्याण रोड रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी आझमी भिवंडीत आले होते. या दौऱ्यादरम्यान, हिंदी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मराठीत प्रतिक्रिया विचारली. यावर आझमी यांनी अत्यंत मुजोरीने उत्तर दिले.

'ये भिवंडी है, इथं मराठी बोलण्याची गरज काय' (Ye Bhiwandi hai, where is the need to speak Marathi?) अशा शब्दांत त्यांनी मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केले.

आझमींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाची लाट उसळली आहे.

मनसेचा (MNS) थेट इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आझमींच्या वक्तव्यावर टीका केली आणि म्हटले की, 'अबू आझमी डोक्यावर पडले आहेत. चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत.'मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी अधिक तीव्र प्रतिक्रिया देत, 'मराठीची लाज वाटत असेल, तर त्यांना मनसे स्टाईलने (MNS style) उत्तर देऊ,' असा थेट इशारा दिला आहे.

( नक्की वाचा : Shocking: 'स्वीटी बेबी डॉल' बोलून चैतन्यानंद बाबा करत होता मुलींचा सौदा; व्हॉट्सॲप चॅटने उघड झाला 'डर्टी' खेळ )
 

भाजपची टीका

भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी अबू आझमींचा समाचार घेतला. 'भिवंडी असो, गोवंडी असो किंवा चंडी असो, महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल,' अशा शब्दांत त्यांनी आझमींना महाराष्ट्राची राजभाषा मराठीची जाणीव करून दिली. 

भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 'उद्धव ठाकरे अबू आझमींना जाब विचारणार का?' असा सवाल बन यांनी केला आहे.

अबू आझमी आणि वाद: जुनं समीकरण कायम
वादग्रस्त वक्तव्य करण्याची अबू आझमींची ही पहिली वेळ नाही. राजकारणासाठी आणि आपली व्होटबँक (votebank) मजबूत करण्यासाठी ते अनेकदा अशी वक्तव्ये करतात.यापूर्वी त्यांनी आषाढी वारी सोहळ्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. पालखी सोहळ्यामुळे रस्ते जाम होतात, असे विधान त्यांनी केले होते. टीका झाल्यावर त्यांनी नंतर माफी मागितली होती आणि 'वारकरी बांधवांबद्दल आदरच आहे' असे स्पष्टीकरण दिले होते.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा मिळावा यासाठी सरकारचा मराठी भाषा विभाग प्रयत्न करत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून 'ये भिवंडी है... मराठीची काय गरज' असे वक्तव्य होणे, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजभाषेचा आदर ठेवणे आवश्यक आहे, याची आठवण त्यांना करून देणे आता गरजेचे झाले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com