ओंकार कुलकर्णी
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपली ठाम भूमिका मांडली आहे. "हिंदी शिकायची इच्छा असेल तर नक्की शिकावी, पण तिची सक्ती योग्य नाही. मी एक मराठी माणूस आहे. कोणत्याही भाषेची सक्ती मला मान्य नाही," असं मत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं. स्वप्नील जोशी हे धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात आले होते. या दौऱ्यात संवाद साधताना त्यांनी केवळ पर्यावरणविषयक योगदानच नव्हे तर सामाजिक विषयांवरही स्पष्टपणे आपलं मत मांडलं.
स्वप्नील जोशी म्हणाले, “राज्य ही अनेक भाषांची शान आहे. ज्याला हिंदी शिकायची आहे, त्याने शिकावी. पण कुठल्याही भाषेची सक्ती केली जाणं चुकीचं आहे. मराठी माणूस म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की मातृभाषेला गमावून दुसऱ्या भाषेचं दडपण येणं योग्य नाही.” स्वप्नील जोशी यांनी यावेळी ऑनलाइन जुगाराच्या जाहिरातींवर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मान्य केलं की काही वर्षांपूर्वी त्यांनी अशा जाहिरातींमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्यानंतर समाजातून आलेल्या विरोधामुळे त्यांनी त्या थांबवल्या.
"पाच वर्षांपूर्वी मी अशा जाहिराती केल्या होत्या. काही सामाजिक संस्थांनी आणि जागरूक नागरिकांनी निवेदन दिलं. त्यानंतर मी त्या जाहिराती थांबवल्या. आता मी स्पष्ट निर्णय घेतला आहे की, यापुढे अशा कोणत्याही जुगारविषयक किंवा ऑनलाइन गेमिंगशी संबंधित जाहिराती मी करणार नाही," असं त्यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केलं. दरम्यान मराठी भाषेबाबतही त्याने आपली भूमीका स्पष्ट केली आहे. हिंदी सक्तीला त्याने ठाम विरोध दर्शवला आहे. ज्याला शिकायची असेल त्याला शिकू द्या पण त्याची सक्ती करू नका असे त्यांने म्हटले आहे.
पहिली पासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण वाढता विरोध लक्षात घेता सरकारने तो निर्णय मागे घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून याबाबत प्रतिक्रीयाही उमटल्या. अनेक जण हिंदी विरोधात एकवटले. तर काहींनी हिंदीचे समर्थन केले. पण मराठी भाषिकांचा रेटा पाहाता सर्वांनाच आवरतं घ्यावं लागलं. राष्ट्रीय पातळीवरही याचे राजकीय पडसाद उमटले. आता मराठी चित्रपट सृष्टीतूनही याबाबत रोखठोक प्रतिक्रीया येत आहेत.