- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतान यांच्याशी तुलना केली होती
- भाजपने अहिल्यानगरमध्ये सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतीमेस जोडे मारो आंदोलन केले
- भाजपने सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपने सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतान यांच्या सोबत केली होती. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्याचं भाजपने सांगितलं. शिवाय अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतीमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्यावतीने हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
अहिल्यानगरचे भाजप नेते अनिल मोहिते आणि बाबासाहेब सानप यांनी हे बक्षिस जाहीर केले आहे. सपकाळ यांनी त्वरीत राजीनामा ही दिला पाहीजे अशी मागणी ही भाजपच्या वतीने करण्यात आली. वोट बँकेसाठी अशी वक्तव्य केली जात असं ही ते म्हणाले. काँग्रेसकडून अजून काय अपेक्षा करणार असा प्रश्न ही त्यांनी केली आहे. सपकाळांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त करताना त्यांची जीभ छाटणाऱ्याला दहा लाखाचे बक्षिस ही जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे काँग्रेस आणि भाजपमधील वाद चिखळण्याची दाट शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात सपकाळ यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलने केली जात आहेत. नाशिक मध्ये ही सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केले गेले. विशेष म्हणजे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर भाजपकडून हे आंदोलन केले गेले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळला गेला. शिवाय हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी ही करण्यात आली. आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आंदोलनात सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिले पाहिजे. कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवले, असे वक्तव्या हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपनेही हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सपकाळांच्या अडचणीत भर पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सपकाळ यांना फटकारले आहे.