राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आज (सोमवार, 27 मे) मुंबईमध्ये झाला. या मेळाव्यात अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशी स्पष्ट केली. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर होणारी राज्यसभेची पोटनिवडणूक, आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप, पुणे अपघात यासह वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा त्यांनी वेळी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार ?
2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही पक्षानं मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. 2004 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर पक्ष फुटला असता, असं वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. शरद पवारांच्या त्या वक्तव्याला अजित पवारांनी उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी 'ते धादांत खोटं' बोलत आहेत असं अजित पवारांनी सांगितलं.
'शरद पवारांसोबत त्यावेळी झालेल्या चर्चेत मी देखील होतो. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते होती. मुख्यमंत्रीपद आपल्याकडंच हवं अशी सर्वांची इच्छा होती. मी त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक नव्हतं. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचं काम भुजबळांनी केलं हे कुणीही नाकारु शकत नाही.'
( नक्की वाचा : शरद पवारांना धक्का, 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान NCP अजित पवार गटाच्या वाटेवर )
मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही?
अजित पवार यांनी यावेळी बोलताना भुजबळांना मुख्यमंत्री न करण्याचं कारण सांगितलं. 'मला त्याबद्दल बातमी मिळाली आहे. अर्थात माझी बातमी खरी आहे. यापूर्वी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी वर्षभरात शरद पवारांचं ऐकणं सोडून दिलं होतं. एका वर्षाच्या आतच नाईक एका ठिकाणी म्हणाले, एखादं सावज माझ्या टप्प्यात आलं की मी ते सावज लगेच टिपतो, असं बरंच काही ते बोलून गेले होते. त्यानंतर छगन भुजबळांसह आम्हा 17 नेत्यांना त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. त्यानंतरच सर्व गडबड सुरु झाली होती. भुजबळांना मुख्यमंत्री केलं तर ते देखील आपलं ऐकणार नाहीत, अशी भीती शरद पवारांनी वाटली, असा दावा अजित पवारांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसनं 2004 साली मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आमचाच मुख्यमंत्री राज्यात राहिला असता. आमच्यापैकी कोणताही नेते मुख्यमंत्री झाला असता. छगन भुजबळ त्यानंतर आर.आर. पाटील आणि इतर नेतेही मुख्यमंत्री होऊ शकले असते, असं अजित पवार यावेळी म्हणाले.