अजित पवारांनी महायुतीकडून विधानसभे निवडणूक लढत जोरदार कमबॅक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 41 आमदार निवडून आले. त्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुळदाण उडाली होती. त्यांचा केवळ एकच खासदार निवडून आला. पत्नी सुनेत्रा पवार यांचाही पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांनी जोरदार मुसंडी मारली. मात्र या निवडणुकीत त्यांचे काही उमेदवार पराभूत झाले. या पराभूत उमेदवारांची अजित पवारांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी आपल्याच मित्र पक्षाच्या तक्रारींचा पाढा वाचला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून दिले. आता त्यांनी संघटनेकडे लक्ष दिले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक त्यांनी बोलावली होती. त्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पराभव का झाला याचा आढावा घेण्यात आला. यावेळी यशवंत माने,देवेंद्र भुयार,बाळासाहेब आजबे,सुनील टिंगरे,अतुल बेनके आणि राजेश पाटील हे पराभूत उमेदवार उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी
या बैठकीत पराभूत उमेदवारांनी यावेळी पराभवाचे खापर आपल्या मित्रपक्षांवर फोडले आहे. मित्र पक्षाने मदत न केल्यामुळेच आपला पराभव झाल्याचा सुर त्यांनी लावला होता. शिवाय भाजपनेही कोणतीही मदत केली नाही असा आरोपही या बैठकी करण्यात आला. भाजपच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झटले पण मित्र पक्षांनी काहीच काम केले नाही असंही सांगण्यात आलं. आपला पराभव व्हावा यासाठीच प्रयत्न केले गेले की काय असा संशयही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
ट्रेंडिंग बातमी - 'पक्षाने माझी किंमत केली पाहिजे' भाजपचे सर्वात सिनिअर आमदार थेट बोलले
दरम्यान सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे अजित पवारांनी ऐकून घेतले. त्यानंतर पराभवाने खचून जावू नका. मी तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे. आता पुर्ण ताकदीने कामाला लागा. पुढच्या निवडणुकीत जिंकायचं आहे हे डोक्यात ठेवून आतापासूनच मैदानात उतरा असंही ते म्हणाले. जी काही मदत लागेल ती सरकार आणि पक्ष म्हणून पुरवली जाईल असं आश्वासनही यावेळी अजित पवारांनी सर्व पराभूत उमेदवारांना दिली आहे. शिवाय ज्यांनी मदत केली नाही त्यांची माहित संबधीत पक्षाच्या प्रमुखांना देवू असंही आश्वासन दिलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची असा पेच पवारांसमोर आहे. मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे. शिवाय महिला आणि अल्पसंख्याकांनाही प्रतिनिधीत्व देण्याची रणनिती अजित पवारांची आहे. सध्या कोणाला कोणती खाती यावर चर्चा सुरू आहे. त्यातून मार्ग काढल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील असं अजित पवारांनीही स्पष्ट केले आहे.