BJP - RSS Meet : ‘भाजपला आता संघाची गरज नाही...' भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मनधरणी करण्यासाठी प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मुंबईत बंद दरवाजाच्या आड चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत संघाच्या असहकार्यामुळे भाजपला अपयश आले. आता विधानसभेला तरी संपूर्ण सहकार्य करा, अशी विनंती भाजप नेत्यांनी केली. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी त्यांच्यावर टीका करणे टाळा, अशी विनवणी भाजप नेत्यांनी संघाकडे केल्याची माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संघानं उपटले होते कान
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर संघ परिवारानेही भाजपचे कान उपटले होते. ऑर्गनायझर या मुखपत्रातून व विवेक या मासिकातून संघ परिवाराशी संबंधित लेखकांनी अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचे कसे नुकसान झाले, हे जाहीररीत्या सांगितले होते. भाजपप्रेमी मतदार व पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. मात्र भाजपचे केंद्रीय नेते अजित पवारांशी युतीबाबत फेरविचार करण्यास तयार नाहीत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच पुण्यात सभा घेतली, त्यात त्यांनी अजित पवारांच्या गटासह महायुतीच्या नेत्यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. संघाने वारंवार सांगूनही भाजप अजितदादांची संगत सोडण्यास तयार नसल्याने संघ परिवारात अजूनही नाराजी आहे. या सर्व विषयांवर बुधवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
( नक्की वाचा : ... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान )
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही ज्येष्ठ नेते संघ परिवाराच्या मुंबईतील 'यशवंत भवन' कार्यालयात गेले होते. संघाकडून सहसरकार्यवाह अतुल लिमये व अरुण कुमार, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह भारतीय मजदूर संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
.... म्हणून फडणवीसांचा राजीनामा नाही
लोकसभेतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर 7 जून 2024 रोजी फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानी सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्यासह काही संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन राजीनामा न देता सरकारमध्ये राहूनच पक्षकार्य करण्याचे आदेशवजा सूचना केली होती. तो सल्ला फडणवीस यांना ऐकावा लागला.
( नक्की वाचा : BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार )
अंतिम निर्णय कोण घेणार?
लोकसभा निवडणुकीत संघ फारसा सक्रिय नसल्याने भाजपला अपयश आले. मात्र हिंदुत्वविरोधी शक्तींना रोखण्यासाठी विधानसभेला संघाच्या मदतीची खूप गरज आहे. त्यामुळे आता तरी संघ परिवाराने सक्रिय मदत करावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली. मात्र संघाच्या पदाधिकाऱ्यांचे फक्त त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यावर कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सरसंघचालक माेहन भागवतच याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं