लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यांना फक्त 1 जागा मिळाली. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमधील निवडणुकीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या कामगिरीचे पडसाद पक्षामध्ये उमटले आहेत. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटापात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातच पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलीय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नोटीस मिळालीय. महायुतीबाबत राजकीय भाष्य बोलताना पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे. जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं प्रवक्त्यांना सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत होती. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच ही वक्तव्य आल्यानं समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून पक्षानं ही कारवाई केली आहे, असं मानलं जातंय.
भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाचाही मोठा पराभव झालाय. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा फक्त 9 जागाच मिळाल्या आहेत. या पराभवानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा असंतोष उफाळून येत आहे.
( नक्की वाचा : Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन )
शिरूर लोकसभा मतदार संघाची भाजपची आढावा बैठक नुकतीत पार पडली. या बैठकीतला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या बैठकीत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांवर सडकून टिका केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, तसा निर्णय घ्या अशी मागणीच त्यांनी केली. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवार सत्तेत असतील तर असली सत्ता आम्हाला नको असंही त्यांनी थेटपणे सुनावलं.