भाजपचे आमदार राम शिंदे यांची नियुक्ती विधान परिषदेच्या सभापती झाली आहे. त्यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिंदे यांचे अभिनंदन करताना जोरदार फटकेबाजी केली. शिवाय गिरीष महाजन यांना ही टोले लगावले. त्यामुळे विधान परिषदेत एकच हशा पिकला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राम शिंदे यांचे अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ते आतापर्यंतचे सर्वात तरूण सभापती आहेत. सरपंच ते विधान परिषदेचे सभापती अशी त्यांची वाटचाल झाली आहे. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. ते यापदाला नक्की न्याय देतील असेही अजित पवार म्हणाले. मात्र याच अजित पवारांबाबत राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. रोहित पवार जिंकावेत म्हणून अजित पवारांनी विनंती करूनही आपल्या मतदार संघात सभा घेतली नाही असा आरोप केला होता.
त्यावर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावरही अजित पवार बोलण्याची संधी अजित पवारांनी सोडली नाही. अजित पवार म्हणाले की मी तुमच्या मतदार संघात सभा घेतली नाही. त्यामुळे तुम्ही राग व्यक्त केला होता. तुमचा निवडणुकीत पराभवही झाला. पण ते एका दृष्टीने बरं झालं. योग्य झालं. जर तुम्ही हरला नसता तर तुम्ही विधान परिषदेचे सभापती झाला नसता. त्यामुळे एक प्रकारे जे झालं ते चांगलं झालं असं अजित पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - संसदेत राडा! भाजपचे 2 खासदार कोसळले; राहुल गांधींनी ढकलल्याचा आरोप
ते त्यावर थांबले नाहीत. जर तुम्ही विजयी झाला असता तर विधानसभेचे सदस्य झाले असते. अशा वेळी फडणवीसांनी तुम्हाला मंत्री करण्याचा निर्णय घेतला असता. तसं झालं असतं तर गिरीश महाजन तुम्हाला कदाचित थांबावं लागलं असतं. आता तुम्ही थोडक्यात वाचले आहात असा टोलाही त्यांनी यावेळी महाजन यांना लगावला. यावेळी अजित पवारांनी एक शेर पण बोलून दाखवला. बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिको। मजबुरियो को मत कोसो। हर हाल में चलना सिको। असं म्हणत अजित पवारांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
ट्रेंडिंग बातमी - Live Update : मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदतो - देवेंद्र फडणवीस
राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्या आधी त्यांनी कर्जत जामखेड विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पराभूत केले होते. त्यानंतर राम शिंदे यांचे काय होणार अशी चर्चा होती. पण त्यांना नवी जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं जात होते. त्यानुसार त्यांना विधान परिषदेचे सभापतीपद देण्यात आलं आहे.