Ajit Pawar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी याबाबतचे काही पुरावे देखील अजित पवारांना दिले होते. या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
अंजली दमानिया यांनी आपली भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी काही पुरावे दिले आहेत. ते पुरावे मी पाहिले आहेत. त्याची तपासणी करण्याचं काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. हे पुरावे तपासून कारवाई केली जाईल, असं पवार यांनी सांगितलं.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही महायुती सरकारची पहिल्यापासूनच भूमिका आहे. त्याचवेळी कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये ही कायद्याच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Walmik Karad : बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेच्या पत्नीचे धक्कादायक खुलासे )
अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (27 जानेवारी) अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, 'अजित पवार आणि माझी जवळपास 25 मिनिटे अजित पवार आणि माझी भेट झाली. सुरुवातीपासून त्यांचे म्हणणे होते की बीडमध्ये झालेलं काळीमा फासणारं कृत्य आहे त्याचं मी समर्थन करत नाही. त्यामुळेच मी त्यांना धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कसे एकत्र बिझनेस आहेत, हे दाखवलं. त्यामुळे तुम्ही त्यांचे राजीनामा घेतला पाहिजेत, अशी मागणी मी केली.' या मागणीवर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास दमानिया यांनी व्यक्त केला होता. पण, अजित पवार यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न टाळला असल्याचं स्पष्ट झालं आहे.
सुरेश धस यांना उत्तर
बीड जिल्ह्यातले भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यावर सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी आपलं देणंघेणं नाही. माझा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क आहे. अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाची भूमिका सांगतील. खालच्या गटातील कार्यकर्त्यांना काय वाटतं याच्याशी माझा संबंध नाही, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.